प्रशांत माने कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये सुविधांअभावी शिक्षणव्यवस्थेची बोंब असताना पालिकेच्या सुधारित शाळांमध्येही हे चित्र फारसे समाधानकारक नाही. डोंबिवलीतील अहिल्यादेवी होळकर प्राथमिक विद्यालय ही शाळा या वस्तुस्थितीचे प्रतीक ठरली आहे.पश्चिमेकडील कोपर परिसरात ही शाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या दुमजली शाळेत एकेकाळी १२५ च्या आसपास विद्यार्थी पटसंख्या होती. आजघडीला ती ३६ पर्यंत घसरली आहे. दोन शिक्षिका येथे कार्यरत आहेत. शाळेत पाच संगणक असून त्यातील एकच चालू अवस्थेत आहे. परंतु, तज्ज्ञ नसल्याने संगणकीय ज्ञानापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत. येथे दोन सुरक्षारक्षक आहेत. मात्र, शाळेला सफाई कर्मचारी नसल्याने स्वच्छतेची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ही शाळा समूह साधन केंद्र असल्याने तिच्या अखत्यारीत येणाऱ्या २८ शाळांचे कामकाजही त्यांनाच पाहावे लागते. विशेष बाब म्हणजे शाळा कशी असावी, याचा आदर्श परिपाठ ही शाळा आहे. शाळेच्या सुरुवातीपासूनच सुविचारांसह आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांचे कार्य येथील भिंतींवर रेखाटले आहे. यात इंदिरा गांधी, राणी बंग, सायना नेहवाल, डॉ. मंदा आमटे, मेधा पाटकर, लता मंगेशकर, किरण बेदी, कल्पना चावला यांचा समावेश आहे. महापालिकेच्या एकूण ७४ शाळा आहेत. यातील १० शाळा पटसंख्येअभावी बंद केल्या आहेत.
चांगल्या वातावरणातही पटसंख्या घसरलेलीच
By admin | Updated: July 9, 2015 23:55 IST