गंभीर रुग्णांनाही प्राणवायू मिळेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:04 AM2020-07-27T01:04:56+5:302020-07-27T01:05:09+5:30

गंभीर कोविड रुग्णांना बऱ्याचदा आॅक्सिजनपुरवठा करावा लागतो. ठाणे जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर दिवसागणिक वाढत असताना, आॅक्सिजनपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर आरोग्य यंत्रणा कितपत गंभीर आहे, याची पडताळणी ‘लोकमत’ने केली असता, अनेक धक्कादायक मुद्दे उघडकीस आले. काही पालिकांच्या हद्दीत पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांना आॅक्सिजन सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. कुठे पालिका प्रशासनात या मुद्यावर ताळमेळ दिसत नाही, तर बदलापूरसारख्या ठिकाणी आॅक्सिजनयुक्त खाटांची सोयच उपलब्ध नसल्याचे वास्तव या पडताळणीत उघड झाले. रुग्णांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर मुरलीधर भवार, सदानंद नाईक, पंकज पाटील आणि धीरज परब यांनी केलेला हा रिअ‍ॅलिटी चेक...

Even critically ill patients do not get oxygen ... | गंभीर रुग्णांनाही प्राणवायू मिळेना...

गंभीर रुग्णांनाही प्राणवायू मिळेना...

googlenewsNext

- मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी कोरोनाशी लढा देण्यासाठी उपचारांच्या सुविधा वाढवताना जम्बो हेल्थ सेटअप उभारत आहे. त्यात आॅक्सिजनयुक्त खाटा असल्याने आॅक्सिजन सिलिंडर पुरवण्याचे काम खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. रुग्णांना वेळीच आॅक्सिजन मिळाल्यास त्यांचा जीव वाचू
शकतो. मात्र, सध्या या सिलिंडरची मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी व्यस्त स्थिती असल्याने आॅक्सिजन सिलिंडर रुग्णांना मिळणे दुरापास्त झाले आहे.
केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांना रुग्णालयांत खाट, त्यातही आॅक्सिजनयुक्त खाट मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना त्यासाठी धावपळ करावी लागत आहे. केवळ प्रकृती गंभीर असलेल्यांनाच आॅक्सिजन सिलिंडर दिला जात नाही, तर श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना घरच्याघरी आॅक्सिजन सिलिंडर घेतल्यास त्रास कमी होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे रुग्णालयांतील रुग्णांपेक्षा घरी क्वारंटाइन होऊन आॅक्सिजन सिलिंडर घेणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. परिणामी, आॅक्सिजन सिलिंडरची मागणी वाढत आहे.
मध्यंतरी, शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हरांड्यात रुग्णांना बसवून आॅक्सिजन दिला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दुसरीकडे आॅक्सिजनयुक्त खाटा न मिळाल्याने आतापर्यंत तिघा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणारे एजन्सीधारक विकी म्हणाले की, दिवसाला ५०० आॅक्सिजन सिलिंडरची मागणी असून, ती पुरविणे शक्य होत नाही. त्यामुळे आमच्याकडेही साठा नाही.
घरी सिलिंडर देण्यासाठी तो रिफील करावा लागतो. परंतु, रिकामा सिलिंडर नसल्याने रिफिलिंगची समस्या आहे. बी-टाइप आॅक्सिजन सिलिंडर हा लहान आकाराचा असतो. त्यातही यूज अ‍ॅण्ड थ्रो व जर्मन बाटला, अशा दोन स्वरूपात सिलिंडर उपलब्ध आहेत. त्याची किंमत १० ते ११ हजार रुपये आहे. एका रुग्णाला तो नऊ तास चालू शकतो.
जम्बो आॅक्सिजन सिलिंडर हा घरच्या वापरासाठी नसतो. त्याची किंमत १५ ते १६ हजार रुपये आहे. तो किमान दोन दिवस पुरतो. त्याचा वापर रुग्णालयात केला जातो. तर, मोठ्या रुग्णालयांत सेंट्रलाइज्ड आॅक्सिजनपुरवठा यंत्रणा असते. त्याची किंमत दीड ते पावणेदोन लाख रुपये इतकी असते. एकाच वेळी त्यातून अनेक रुग्णांना आॅक्सिजन पुरवला जाऊ शकतो.
डोंबिवलीतील डॉ. सुनील पुणतांबेकर यांची सेवाभावी संस्था आरोग्य साधने तसेच आॅक्सिजन सिलिंडर पुरवते. जम्बो सिलिंडर नेआण करण्यासाठी सोयीचा नसतो. त्यामुळे विजेवर चालणारी १२ आॅक्सिजन यंत्रे त्यांच्याकडे असून, ते ती नाममात्र भाड्याने देतात. हे यंत्र हवेतील ३१ टक्के आॅक्सिजनचे रूपांतर ९५ टक्के आॅक्सिजनमध्ये करते. हे यंत्र २४ तास वापरता येऊ शकते.
बहुतांश खाटा आॅक्सिजनयुक्त
केडीएमसी डोंबिवलीत क्रीडासंकुलापाठोपाठ जिमखाना, पाटीदार भवन तसेच कल्याणमधील फडके मैदानाजवळील आर्ट गॅलरी, काळसेकर शाळेत कोविड रुग्णालये सुरू करत आहे. त्यामुळे जवळपास एक हजार खाटा यातून उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी बहुतांश खाटा या आॅक्सिजनयुक्त आहेत.

अंबरनाथमध्ये सोय, बदलापूरला गैरसोय
पंकज पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या ५०० बेडच्या कोविड रु ग्णालयात २०० बेड हे आॅक्सिजन लागणाºया रुग्णांसाठी असल्याने या आॅक्सिजन कक्षासाठी पालिकेने तीन लाख खर्च करून सेंट्रलाइज्ड आॅक्सिजन केंद्र उभारले आहे. दोन लाखांची तरतूद सिलिंडरच्या बदलांसाठी ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, बदलापूरमध्ये आॅक्सिजन रु ग्णालय नसल्याने तेथे खर्चाची तरतूद केलेली नाही.
अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेजमध्ये उभारलेल्या कोविड
रु ग्णालयात २०० बेडला आॅक्सिजनची सुविधा आहे. अखंडित आॅक्सिजन पुरवठ्यासाठी सेंट्रलाइज्ड आॅक्सिजन कक्ष उभारला आहे. हा कक्ष उभारण्यासाठी पालिकेने सरासरी तीन लाखांच्या घरात खर्च केला आहे. तर, ते सिलिंडर भरण्यासाठी दोन लाखांची तरतूदही केली आहे. यासोबतच, लिक्विड आॅक्सिजन खरेदीसाठीही तरतूद केली आहे.
बदलापूर पालिकेने केवळ कोविड केअर सेंटर उभारले असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही रुग्णाला आॅक्सिजनची गरज भासल्यास त्याला लागलीच दुसºया रुग्णालयात हलवण्यात येत असल्याने त्या ठिकाणी आॅक्सिजनसाठी खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बदलापूर पालिका नव्याने ५०० बेडचे रुग्णालय उभारत असल्याने त्या ठिकाणी सरासरी २०० बेडसाठी आॅक्सिजन कक्ष उभारला जाणार असून त्यासाठी लागणाºया सेंटरलाइज्ड आॅक्सिजन कक्षासाठी पालिकेने १० लाखांची तरतूद करून ठेवली आहे.

उल्हासनगरमध्ये सिलिंडरची मोजदाद नाही
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात एक कोविड रुग्णालय, चार क्वारंटाइन सेंटर, तर दोन आरोग्य केंद्रे महापालिकेने उभारली आहेत. तेथे आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त आॅक्सिजन सिलिंडर लावण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने अद्याप बिल दिले नसल्याने त्याची निश्चित किंमत सांगता येत नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने अतितीव्र, सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेले रुग्ण, अशी तीन टप्प्यांत रुग्णांची विभागणी केली आहे. अतितीव्र रुग्णांना कोविड रुग्णालयात भरती करण्यात येते. तेथे सर्व खाटांना आॅक्सिजनची तर, काही खाटांना व्हेंटिलेटरची सुविधा आहे. तर, आरोग्य केंद्रे व क्वारंटाइन सेंटरमध्ये आॅक्सिजन खाटांची सुविधा मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
रुग्णांची संख्या पाहता आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त आॅक्सिजन सिलिंडर लागल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. मनपा थेट कंपनीकडून आॅक्सिजन सिलिंडर घेत आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत मनपाला बिल पाठविलेले नाही, अशी माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. दुसरीकडे मनपाचे लेखाधिकारी विकास चव्हाण म्हणाले की, आॅक्सिजन सिलिंडरचे बिल लेखा विभागाकडे आलेले नाही. त्यामुळे सिलिंडरवर महापालिकेने किती खर्च केला, याची निश्चित माहिती सांगता येत नसल्याचे सांगितले.
आरोग्य विभागाचे उपायुक्त
मदन सोंडे यांनी विभागाने किती आॅक्सिजन सिलिंडर आजपर्यंत घेतले, त्यासाठी किती खर्च झाला, याबाबतची निश्चित माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच मनपाच्या आरोग्य विभागात सावळागोंधळ असून कुठे ताळमेळ नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Even critically ill patients do not get oxygen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.