वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसाठी छत्री आणि वाहतूक चौकीची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST2021-02-22T04:30:18+5:302021-02-22T04:30:18+5:30
ठाणे : ऊन असो किंवा पाऊस वर्षाचे बाराही महिने रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक नियंत्रण ...

वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसाठी छत्री आणि वाहतूक चौकीची उभारणी
ठाणे : ऊन असो किंवा पाऊस वर्षाचे बाराही महिने रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक नियंत्रण शाखेने आता सुसज्ज चौकी आणि छत्रीची उभारणी केली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने एका खासगी कंपनीच्या सहकार्यातून चौकी आणि छत्रींची उभारणी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन, जांभळी नाका येथील टॉवर नाका, कळवा पूल येथे वाहतूक चौकीची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खोपट सिग्नल, कापूरबावडी सिग्नल आणि गावदेवी येथे वाहतूक पोलिसांसाठी छत्री उभारण्यात आली आहे. अत्यंत आकर्षक आणि आटोपशीर अशा या चौकीमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी किमान बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांना यापूर्वीही अशाप्रकारे काही ठिकाणी छत्री उपलब्ध करून देण्यात आली होती. मध्यंतरी रस्ता रुंदीकरणामध्ये या छत्र्या निकामी झाल्या होत्या. अशावेळी पोलिसांना मात्र भरउन्हातच वाहतुकीचे नियंत्रण करावे लागत होते. याची गांभीर्याने दखल घेत आयडीएटीक कंपनीने या छत्र्यांची उपलब्धता करून दिली. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना त्यांचे नियमित कामकाज करण्यासाठी वाहतुकीचे कर्तव्य बजावण्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी वाहतूक चौकीही गरजेची होती. ठाणे शहरात लवकरच इतरही काही महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा चौक्या आणि छत्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.