बाप्पांना भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 29, 2015 01:18 IST2015-09-29T01:18:26+5:302015-09-29T01:18:26+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा

बाप्पांना भावपूर्ण निरोप
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा
केल्यानंतर रविवारी जिल्हाभरातील विविध विसर्जनस्थळांवर सुमारे ३१ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. ‘काहीतरी कर ठाणेकर...’ या टॅगलाइनच्या आधारावर लोकमतने राबविलेल्या विशेष मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अनेक भक्तांनी गोंगाटासह आवाजाचे प्रदूषण न करता आणि विसर्जनस्थळी विशेष स्वच्छता राखून तलावांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मदत केलीच, शिवाय इतरांनाही त्यापासून परावृत्त केले. लोकमतच्या या मोहिमेचे सर्वांनीच स्वागत केले. याअंतर्गत संपूर्ण उत्सवकाळात अनेक सोसायट्यांतील रहिवाशांनी आवाजाचे प्रदूषण न करता शांततेत गणेशाचे स्वागत केले.
तसेच निरोपही शांततेत दिला. शिवाय, विसर्जनस्थळावर पर्यावरणाचे भान राखून इको-फ्रेण्डली बाप्पाची संकल्पना खऱ्या अर्थाने राबविली. मासुंदा तलावाच्या ठिकाणी लोकमतच्या स्वयंसेवकांकडून काहीतरी कर ठाणेकर... या संकल्पनेची अधिक माहिती जाणून घेऊन सहभाग दर्शविला तसेच फेसबुक पेजसह लोकमतच्या आगामी उपक्रमातही तनमनाने सहभागाची ग्वाही दिली.
विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणेने चोख कामगिरी पार पाडली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ५०२ सार्वजनिक तर ५ हजार ७४९ घरगुती, तर ठाणे
पोलीस आयुक्तालयामध्ये ६६६ सार्वजनिक
आणि २४ हजार ६६ घरगुती बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप दिला.
ठाणे, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी इको-फ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. त्या ठिकाणीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
---
ठामपाने गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली. यामध्ये रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनीवाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. मासुंदा तलाव येथील दत्तघाट आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व पर्यायी व्यवस्था केली होती. पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत, कोपरी येथे विसर्जन महाघाट, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा यांच्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर, अंबरनाथ -बदलापूर अशा १०९ ठिकाणी विधिवत विसर्जनाची सोय केली होती.
-------
डोंबिवलीत योगाची प्रात्यक्षिके
डोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ६६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची श्रींच्या विसर्जनाच्या पारंपरिक मिरवणुकीत फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान बाप्पांना निरोप देण्यासाठी सालाबादप्रमाणे नगरवासीय आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पारंपरिक मिरवणुकीला जेम्स व जॉयना या ब्रिटिश दाम्पत्यानेही हजेरी लावली होती. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विद्याधाम डोंबिवलीच्या योग पथकाने श्रीकांत देव, छाया लोहिया आणि आर.
कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० योग साधकांच्या योग पथकाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी भाविक मंत्रमुग्ध झाले तसेच साकारलेले मानवी मनोरेही सर्वांना भावले.