‘अमृत’ मिशन फाइलबंद!
By Admin | Updated: April 24, 2017 02:24 IST2017-04-24T02:24:48+5:302017-04-24T02:24:48+5:30
केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा

‘अमृत’ मिशन फाइलबंद!
सुरेश लोखंडे / ठाणे
केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा, मल:निस्सारण, नागरी वाहतूक, उद्यान विकास आदी सुमारे तीन हजार ३१२ कोटींचे प्रकल्प प्रस्तावित केले. पण हे प्रकल्प अद्याप केवळ फाईलमध्येच आहेत. या प्रकल्पांचे काम युध्दपातळीवर सुरू होणे अपेक्षित असतानाही त्याला गती मिळालेली नाही.
नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिका, कुळगांव-बदलापूर नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरण (एमजेपी) यांनी तीन हजार ३३१२ कोटी २६ लाख रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव दिले. यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करून ते पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु या यंत्रणांकडून त्यासाठी फारशा हालचालीच होत नसल्याची बाब दिशा समितीच्या निदर्शनास आली आहे.
त्यामुळेच या प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या हालचाली समितीने सुरू केल्या आहेत. या अमृत मिशनमध्ये देशातील मोजक्याच ५०० शहरांचा समावेश आहे. त्यात राज्यातील ४३ शहरे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, एक नगरपालिका आणि एमजेपीचा त्यात समावेश आहे.
अमृत मिशनव्दारे ठाणे महापालिकेने एक हजार ६६९ कोटीं रूपये खर्चाचे तीन प्रकल्प प्रस्तावित केल. त्यात सर्वाधिक एक हजार ३८ कोटीं खर्चाचा पाणीपुरवठा, तर ६३० कोटींचा मलनि:स्सारण प्रकल्प आणि एक कोटीचे उद्यान आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ८९७ कोटीचे पाच प्रकल्प हाती घेतलेले आहेत. यामध्ये २७ गावांच्या पाणी पुरवठ्यासह ३३ जलकुंभ बांधले जाणार आहेत. यावर ३९९ कोटीं खर्च होणार आहे, तर १३४ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाचा समावेश आहे. कल्याणच्या सहा सेक्टरसह डोंबिवलीतील चार आणि टिटवाळ्यातील दोन सेक्टरमध्ये मलनि:स्सारणाची ही योजना राबविली जाणार आहे. अस्तित्वातील मलनि:स्सारण योजनांच्या दुरूस्तीवर २२२ कोटी खर्च होणार आहे. शहाड ते टिटवाळादरम्यान मोहने, मोहिली व बल्याणी भागातील सध्याच्या मलनि:स्सारणावर १४२ कोटी खर्चाचे नियोजन आहे. या प्रकल्पांसह डोंबिवलीच्या एकतानगर, आयरे येथे उद्यान विकास, तसेच कल्याणच्या तेजपालनगरमध्ये देखील तीन बगीचे विकसित होणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेचा सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प आहे. भिवंडी महापालिकेने २९३ कोटी १३ लाख रूपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे, तर एक कोटी ३६ लाखांचा हरित क्षेत्र विकास, हाळा तलाव व काटई डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लागवडीचा प्रकल्प आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेने ३३७ कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प सादर केला आहे. एमजेपीने पूरक अंबरनाथ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ५१ कोटी ६७ लाखांच्या, तर कुळगांव - बदलापूर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ६२ कोटी ६८ लाखांच्या खर्चास तांत्रिक मंजुरी घेतल्याचे आढळून आले आहे.