सोसायटीच्या बाजूला आढळली वीजदेयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:22 IST2020-08-09T00:22:48+5:302020-08-09T00:22:57+5:30
डोंबिवलीतील घटना; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी

सोसायटीच्या बाजूला आढळली वीजदेयके
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील सुदर्शननगरमधील साईसृष्टी सोसायटीजवळ वीजदेयके फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. वीजदेयकांचे वितरण करणाऱ्या कंत्राटदाराने हा शॉर्टकट अवलंबिला असला, तरी महावितरणचा कंत्राटदारावर कोणताही वचक नसल्याने त्याचा भुर्दंड वीजग्राहकांना सोसावा लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर महावितरणकडून वीजदेयके वाटली जात नव्हती. त्यामुळे ग्राहकांना मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांची सरासरी देयके आली. मात्र, ही देयके जादा रकमेची असल्याने ग्राहक हवालदिल झाले. त्यानंतर, आता वीजदेयकांचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, अचानक वीजदेयकांचा गठ्ठाच सोसायटीच्या बाजूला आढळून आला. हा गठ्ठा टाकणाºयाविरोधात महावितरण कारवाई करणार का, असा सवाल वीजग्राहकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, वीजदेयक भरण्याची अंतिम मुदत ९ आॅगस्ट आहे. मात्र, देयके न मिळालेल्या ग्राहकांना आता दंड भरावा लागणार आहे. महावितरणने वीजबिले वाटण्यासाठी नेमलेल्यांकडून असे प्रकार होत असतील, तर हे काम पुन्हा महावितरणनेच करावे, अशी मागणी होत आहे. महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
महावितरणने काही ग्राहकांना आॅनलाइनद्वारे बिले पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही वीजबिले अनेकांना पाहता येत नाहीत. अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील वायफाय, नेट कनेक्शन वीज नसल्यावर बंद असते. त्यामुळे आॅनलाइन बिल पाहणार कसे, असा प्रश्न काही नागरिकांनी विचारला आहे.