ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक बस

By Admin | Updated: August 5, 2016 02:15 IST2016-08-05T02:15:22+5:302016-08-05T02:15:22+5:30

१०० इलेक्ट्रिक हायब्रीड बसेस घेण्याचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला

Electric bus running in Thane | ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक बस

ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक बस


ठाणे : ठाणे परिवहनच्या सेवेत १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बसेस घेण्याचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. ‘पीपीपी’ तत्त्वावर या बस रस्त्यावर धावणार असल्या तरी त्या बसचे धावणारे मार्ग संबंधित एजन्सी ठरवणार असल्याने तिला हे अधिकार न देता परिवहनने ते अधिकार आपल्याकडे ठेवावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर, विरोधक आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांनी हा विषय मतदानाला टाकून मंजूर करून घेतला.
टीएमटी इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पालिका या बस पीपीपी तत्त्वावर घेणार आहे. त्यामुळे पालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. त्यानुसार, १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात १० बस घेतल्या जाणार आहेत. यामध्ये एका कंपनीने युरोपच्या धर्तीवर ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस धावत आहेत, त्यानुसारच ठाण्यातही त्याच धर्तीवर ही सेवा देण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, दरमहा पालिकेला या बसपोटी १० लाख मिळणार आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव बैठकीत मंजुरीला येताच बसचे रूट ठरवण्याचा अधिकार हा त्या एजन्सीचा असून ते जे रूट ठरवतील, त्या रूटवर या बस धावणार असून टीएमटीच्या बस ज्या रूटवर जात आहेत, ते
त्यांना खुले असणार आहेत. (प्रतिनिधी)
>विरोधक आक्रमक
या बस ज्या रूटवर जातील, त्यावर परिवहनची एकही बस धावणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याच मुद्यावर विरोधक आक्र मक होऊन रूट ठरवण्याचे अधिकार त्या एजन्सीला न देता ते अधिकार परिवहनकडे ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी केली.
हा एजन्सीवाला या बसेस चालवताना सध्या परिवहन ज्या मार्गावर फायद्यात आहे, ते मार्ग निवडेल. याने ठाणे परिवहन सेवा डबघाईला जाईल, असा आरोप मुल्ला यांनी केला.
मात्र, या प्रस्तावावर अखेरपर्यंत प्रशासन आणि सत्ताधारी कायम राहिल्याने या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात प्रस्तावाच्या बाजूने सात तर विरोधात पाच मते पडली.

Web Title: Electric bus running in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.