आठवडेबाजार १४ वर्षांनंतर बंद
By Admin | Updated: August 13, 2015 23:15 IST2015-08-13T23:15:02+5:302015-08-13T23:15:02+5:30
ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या

आठवडेबाजार १४ वर्षांनंतर बंद
ठाणे : ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या या बाजारांवर कारवाई करून ते कायमचे बंद केले आहेत. रहदारीला होणारा अडथळा, महिलांची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे ते बंद करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार, ही कारवाई केल्याची माहिती महापालिकेने दिली. हे बाजार बंद झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांबरोबर फेरीवाल्यांना देखील बसला आहे. परंतु, यामुळे गावगुंड आणि जागा भाड्याने देणाऱ्यांचा धंदाही बंद झाला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भेनाका येथे भरणारा आठवडाबाजार हा कळवा-बेलापूर पट्ट्यातील एकेकाळचा सर्वात मोठा बाजार मानला जात होता. ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा यासारख्या पट्ट्यातील गरीब कामगार, मजुरांची तेथे जत्रा भरत होती. फार पूर्वीपासून या बाजारांचे लोण पसरले होते. गावांमध्ये बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आणि यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना जागा भाड्याने मिळू लागल्या.
या कामगारवर्गासाठी कपड्यांपासून गृहोपयोगी साहित्य, भाजीपाला, खाद्य-पेय, भांडी, खेळणी, स्त्रियांचे विविध प्रकारचे अलंकार आदी वस्तू स्वस्त दरात या बाजारांत उपलब्ध झाल्या. त्यामुळेच ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांतील आठवडाबाजार वेगळे महत्त्व राखून आहेत. मात्र, आठवड्यातील एका दिवसाकरिता भरणारे हे बाजार स्थानिक गुंडांच्या हप्तेखोरीचे साधन बनू लागले होते. या बाजारांत पदपथांवरील जागांचे दरही ठरू लागले होते. मोक्याची जागा मिळवायची असेल तर गल्लीगुंडाला हप्ता देण्याचा पायंडा पडला आणि पुढे महापालिका, पोलीस यांच्यापर्यंत ही साखळी तयार झाली होती.
ठाण्यातील अरुंद रस्त्यांवर भरणारे हे बाजार शहरातील इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले होते. २००८ च्या सुमारास महापालिकेने याला बंदी घातली होती. त्यानंतर, २००९ मध्ये पुन्हा ते सुरू झाल्याने त्याला हप्तेखोरांचे कवच लाभले
होते.