आठ पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार
By Admin | Updated: January 17, 2015 23:20 IST2015-01-17T23:20:03+5:302015-01-17T23:20:03+5:30
पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला.

आठ पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार
पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे मनोर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरविण्यात आले. या निर्णयाची घोषणा पालकमंत्री, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र,याच दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे व मोठ्या गावांची नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका होऊन अल्पावधीतच या नगरपंचायती व नगर परिषदांच्या घोषणा झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका निरर्थक ठरतील व मोठा खर्च वाया जाईल, ही भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. १९ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे व अखेरच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे या बैठकीत ठरले व अपक्षांचीही या संबंधातील सहमती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीतून माघार घेणार असल्याने २८ जानेवारी रोजी होणारी निवडणूक प्रत्यक्षात होणार नाही, असे आजच्या निर्णयावरून दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याकरिता तालुका पातळीवर अधिकार त्या त्या पक्षाध्यक्षांना देण्यात आले असून अपक्षांची सहमतीही तालुका पातळीवरून मिळविण्याची जबाबदारी संबंधित पक्षाध्यक्षांनी घ्यायचे ठरले. या बैठकीला पालकमंत्री सवरा, खा. चिंतामण वनगा, आ. आनंद ठाकूर, आ. विष्णू घोडा, आ. पास्कल धनारे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, माजी खा. बळीराम जाधव, दामू शिंगडा, प्रवीण राऊत, मनीष गणोरे, उत्तम पिंपळे, सुरेश जाधव, विकी शुक्ला इ. मान्यवर पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला माकप आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित नसले तरी या पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून सर्वपक्षीय निर्णयाला आमची सहमती असल्याचे त्यांनी कळविल्याचे पालकमंत्री सवरा यांनी सांगितले. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.