चिठ्ठ्यांमुळे सभापतींसह स्थायीचे आठ सदस्य निवृत्त

By Admin | Updated: November 18, 2016 03:16 IST2016-11-18T03:16:41+5:302016-11-18T03:16:41+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य गुरुवारी निवृत्त झाले.

Eight members of the Standing Committee, including the Chairman, retire due to chatter | चिठ्ठ्यांमुळे सभापतींसह स्थायीचे आठ सदस्य निवृत्त

चिठ्ठ्यांमुळे सभापतींसह स्थायीचे आठ सदस्य निवृत्त

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य गुरुवारी निवृत्त झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. निवृत्त झालेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजपाचे तीन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. विशेष म्हणजे, चिठ्ठीमुळे सभापती संदीप गायकर यांनाही निवृत्त व्हावे लागले. तर, निवृत्त न झालेल्या उर्वरित आठ जणांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे.
महापालिकेच्या १६ जणांच्या स्थायी समिती सदस्यांमध्ये गायकर, रमाकांत पाटील, विशाल पावशे, शिवाजी शेलार, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे (सर्व भाजपा), दशरथ घाडीगावकर, मोहन उगले, राजाराम पावशे, प्रेमा म्हात्रे, हर्षाली थविल, राजेश मोरे, राजवंती मढवी-शेट्टी (सर्व शिवसेना), कासीफ तानकी (शिवसेना सहयोगी अपक्ष) यांच्यासह ज्योती मराठे (मनसे) आणि जान्हवी पोटे (काँग्रेस) होते. १ डिसेंबरला समितीचा वर्षाचा कालावधी संपत असल्याने आठ चिठ्ठ्या काढून निवृत्ती प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यासाठी प्रत्येक सदस्याच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. गजानन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आठ चिठ्ठ्या काढून त्या केडीएमसीचे सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे दिल्या. त्यानुसार, गायकर, धात्रक, पाटील, मढवी, थविल, पावशे, तानकी आणि पोटे हे निवृत्त झाले.
या निवृत्ती प्रक्रियेत सहयोगी अपक्षासह शिवसेनेचे चार सदस्य निवृत्त झाले आहेत. भाजपानंतर आता पुढचे सभापतीपद शिवसेनेला मिळणार आहे.
त्यामुळे सदस्यपद मिळण्यासाठी शिवसेनेत भाऊगर्दी आहे. त्यातच पुढचा सभापती कोण, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. समितीत स्थान अबाधित राहिलेल्यांपैकी एकाला याचा मान मिळतो का, की नवीन सदस्याची वर्णी लागते, याकडे आता लक्ष लागले आहे.
निवृत्त झालेल्या सदस्यांचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. निवृत्त न झालेले आठ आणि नवीन नियुक्त होणारे आठ सदस्य, अशा १६ सदस्यांची समिती स्थापन झाल्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या वेळी पावशे आणि म्हात्रे या भाजपाच्या दोन सदस्यासंह काँग्रेसच्या पोटे अनुपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Eight members of the Standing Committee, including the Chairman, retire due to chatter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.