आठ लाख १८ हजार मतदारांची छायाचित्रे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:58 IST2021-04-20T23:58:26+5:302021-04-20T23:58:48+5:30
मतदार यादीतून नावे वगळणार : मतदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे केले आवाहन

आठ लाख १८ हजार मतदारांची छायाचित्रे नाहीत
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूजनेटवर्क
ठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ६६ लाख ३७ हजार २२७ मतदारांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत तब्बल आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे उघड झाले आहे. या मतदारांनी त्यांचे छायाचित्रे न दिल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकडे मतदारांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करून आपल्या मतदारसंघातील निवडणूक शाखेला छायाचित्र उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील शहापूर व भिवंडी हे दोन मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर अंबरनाथ मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. अन्य प्रवर्गासाठी उर्वरित १५ मतदारसंघ जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वाढ होऊन अन्य राज्यातील लोकांना मुंबईजवळील ठाणे जिल्हा निवासस्थानास रोजगारासाठी आकर्षित करीत आहे. सध्या जिल्ह्यात सहा महापालिका असल्याने जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे. येथील तब्बल ६६ लाख ३७ हजार २२७ नागरिकांना मतदानाचा हक्क बहाल झाला आहे. यामध्ये ३६ लाख १० हजार ९३३ पुरुषांसह ३० लाख ३७ हजार २७२ स्री मतदारांचा समावेश आहे. या मतदारांपैकी बहुतांशी मतदार शहरी भागात वास्तव्याला आहेत.
या १८ मतदारसंघातील ५८ लाख १९ हजार २४८ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहेत. उर्वरित १२.३२ टक्के म्हणजे आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे निदर्शनात आले आहे.
५८ लाख जणांकडे ओळखपत्र
मतदानाचा हक्क बहाल झालेल्या ५८ लाख ९१ हजार ६६ मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे, तर सात लाख ४६ हजार १६१ (११.२४टक्के) मतदारांकडे मतदान ओळखपत्राचा अभाव आहे. मतदार यादीतील छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र संबंधित मतदारांकडे अपेक्षित असल्याचे आयोगाने नमूद केलेले आहे. अन्यथा, संबंधितांची नावे वगळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे कार्य आयोगाच्या आदेशानुसार वेळोवेळी केले जात आहे. त्यानुसार आजपर्यंत ६६ लाख ३७ हजार २२७ मतदारांची नोंद झाली आहे. यापैकी ५८ लाख १९ हजार २४८ मतदारांची छायाचित्रे आहेत. तर आठ लाख १७ हजार ९७९ मतदारांची छायाचित्रे प्राप्त करण्यासाठी आदेशानुसार कार्यवाही केली जात आहे.
- अपर्णा सोमाणी,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे