आठ कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: August 8, 2016 02:03 IST2016-08-08T02:03:59+5:302016-08-08T02:03:59+5:30
आपत्कालीन विभागात बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजया कंठे यांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश स्वीकारले नसल्याचे कारण निलंबनामागे आहे

आठ कर्मचारी निलंबित
उल्हासनगर : आपत्कालीन विभागात बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजया कंठे यांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश स्वीकारले नसल्याचे कारण निलंबनामागे आहे, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले. लेटलतीफ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकाराने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी अत्याधुनिक सुविधा असलेला आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. पावसाळ्यात भिंत पडणे, पूर येणे, पाणी साचणे, इमारत, झाडे पडणे या अत्यावश्यक कामांसाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. कक्षात २४ तास कर्मचारी तैनात असतील.
मात्र, आठ कर्मचाऱ्यांनी बदली आदेशाला केराची टोपली दाखवत विभागाचा पदभार स्वीकारला नाही. उपायुक्त कंठे यांनी आयुक्तांना याबाबत माहिती दिली.
अखेर, आयुक्तांच्या आदेशानुसार आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकाराने कर्मचारी व अधिकारी यांच्यात खळबळ उडाली आहे. दुपारी १२ नंतर कर्मचारी व अधिकारी आल्यानंतर पालिकेचा कारभार सुरू होतो. आपत्कालीन कक्षात इतर विभागातील कर्मचाऱ्यांची बदली केली जात आहे. कर्मचारी विलंबाने येत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)