परिवहनसाठी आठ अर्ज
By Admin | Updated: February 23, 2017 05:42 IST2017-02-23T05:42:24+5:302017-02-23T05:42:24+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी बुधवारी आठ जणांनी अर्ज भरले.

परिवहनसाठी आठ अर्ज
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी बुधवारी आठ जणांनी अर्ज भरले. यात शिवसेना ४, भाजपा ३, आणि मनसे १ असे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी देताना डावलल्याने सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या अर्जांची गुरूवारी छाननी होणार असून यात कोण बाद होतो, याकडे लक्ष लागले आहे.
प्रसाद माळी, संजय राणे, कल्पेश जोशी (सर्व भाजपा), संजय पावशे, मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी, बंडू पाटील (सर्व शिवसेना), संदेश प्रभुदेसाई (मनसे) यांनी उमेदवारी अर्ज भरले. पालिकेतील उपलब्ध संख्याबळानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे समितीवर निवडून जाऊ शकतात. त्यांनी अतिरिक्त अर्ज भरला आहे. तर भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. आणखी एक सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांनाही काही मतांची आवश्यकता आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी होती. त्यासाठी २९ जणांनी अर्ज नेले होते. त्यातील केवळ आठ जणांनी अर्ज भरले. त्यामुळे उमेदवारी देताना डावलल्यांमध्ये नाराजी उद्भवणार हे अपेक्षित होते. त्याची प्रचिती बुधवारी आली. भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी तशी नाराजी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
दरम्यान, नियम ३१(अ) नुसार प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची मागणी मनसेकडून होत आहे. तरीही गुप्त मतदान पद्धतच अवलंबली जाणार आहे. (प्रतिनिधी)
अर्ज भिरकावण्याचा प्रकार
शिवसेनेतही उमेदवारी न दिल्याने एका इच्छुकाने पदाधिकाऱ्यांवर अर्ज भिरकावण्याचा प्रकार घडला. भाजपाकडून देण्यात आलेले उमेदवार पाहता येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नरेंद्र पवार यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे. मनसेतून आलेल्या राणे यांना संधी दिल्याने भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.