उल्हासनगरात १२ लाख किंमतीचे खाद्यतेल लंपास; ट्रक चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: July 3, 2024 19:16 IST2024-07-03T19:14:15+5:302024-07-03T19:16:25+5:30
सोहेल खान असे ट्रक चालकाचे नाव, २९ जून ते १ जुलै २०२४ दरम्यान घडला प्रकार

उल्हासनगरात १२ लाख किंमतीचे खाद्यतेल लंपास; ट्रक चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: ट्रक चालकाने पटेल दुकानात नेण्यासाठी दिलेले ११ लाख ९४ हजार किंमतीचे १ हजार खाद्यतेलाचे बॉक्स परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ट्रक चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर शेजारील डावलपाडा नेवाळी येथील ट्रक चालक सोहेल खान यांच्याकडे ११ लाख ९४ हजार किमतीचे प्रिया रिफाईंड सॅनफ्लॉवरचे १ हजार बॉक्स अंबरनाथ येथील पटेल रिटेल दुकानात नेण्यासाठी कमल विजय वाघाणी यांनी दिले होते. एका बॉक्स मध्ये १ किलोचे १२ पॉकेट होते. हा प्रकार २९ जून ते १ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे.
ट्रक चालक सोहेल खान याने खाद्यतेलाचे बॉक्स पटेल रिटेल दुकानात नेण्याऐवजी परस्पर खाद्यतेलाचा अपहार करून वाघाणी यांची फसवणूक केली. फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाल्यावर कमल वाघाणी यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी सोहेल खान याच्यावर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.