ED Tarak Ki Marak for Sarnaika? | सरनाईकांकरिता ईडी तारक की मारक?

सरनाईकांकरिता ईडी तारक की मारक?

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद प्राप्त झाले. तीन टर्म आमदार होऊनही एकाच जिल्ह्यात किती मंत्रिपदे द्यायची, या निकषामुळे सरनाईक यांची संधी हुकली. शिवसेनेने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली. कंगना रानौत हिने उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केल्यावर तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक व्हावी, याकरिता सरनाईक यांनी पाठपुरावा केला. गोस्वामी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. मीरा-भाईंदर हा ठाणे जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला होता. नरेंद्र मेहता यांच्यासारखे मातब्बर आमदार तेथे भाजपचे प्रतिनिधित्व करीत होते. भाजपच्या गीता जैन यांनी मेहता यांना मात दिली. अपक्ष विजयी झालेल्या जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करावा याकरिता सरनाईक यांनी प्रयत्न केले व त्यांना सेनेत आणून मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना मजबूत केली. सरनाईक यांचे हे आक्रमक होणे यामागे जिल्ह्यातील दोन मातब्बर मंत्र्यांच्या प्रभावात आपले राजकीय अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या सरनाईक यांचे गेली काही वर्षे त्यांच्याशी राजकीय वैर निर्माण झाले होते. मात्र म्हाडाच्या वर्तकनगर येथील घरांच्या प्रकल्पाच्या निमित्ताने सरनाईक यांनी आव्हाड यांच्याशी असलेले जुने वैर संपुष्टात आणले. यामुळे सरनाईक यांची राजकीय घोडदौड गेल्या काही महिन्यांत चर्चेत होती.

ओवळा-माजिवडा हा सरनाईक यांचा मतदारसंघ मीरा-भाईंदरला खेटून असल्याने व मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा भाजप सरकारच्या काळात दबदबा असल्याने सरनाईक व मेहता यांच्या परस्परपूरक राजकारणाची राजकीय वर्तुळात चर्चा असायची. मेहता यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ट संबंध होते. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास ठाण्यात शिवसेनेचा एक बडा नेता भाजप गळाला लावणार, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरू होती. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी भाजपचे मनसुबे उधळून लावले. सत्ता जाताच मीरा-भाईंदरमध्ये मेहता यांचेही ग्रह फिरले व सरनाईक यांनी मुसंडी मारली. त्यामुळे ईडीची कारवाई ही सेनेचे नेते आरोप करतात तशी राजकीय हेतूने केलेली असण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.

ठाण्यातील नेत्यांची चुप्पी
सरनाईक यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचल्यानंतर खा. संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत केंद्र सरकारचा समाचार घेतला. मात्र शिवसेनेचे सर्वोच्च नेते तसेच ठाण्यातील प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सरनाईक यांची शिवसेना आता कशी पाठराखण करणार व कारवाई राजकीय हेतूने असल्यास त्यांना ती राजकारणात फलदायी ठरणार का, याची शिवसैनिकांत उत्सुकता आहे.

Web Title: ED Tarak Ki Marak for Sarnaika?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.