भिवंडीत राजकीय भूकंप?
By Admin | Updated: March 23, 2017 01:25 IST2017-03-23T01:25:58+5:302017-03-23T01:25:58+5:30
कमळाचे चिन्ह बाजूला ठेवून इतर पक्षातील निवडून येण्याच्या क्षमतेचे नेते एकत्र करून भाजपा करत असलेली आघाडी आणि समाजवादी पक्ष,

भिवंडीत राजकीय भूकंप?
रोहिदास पाटील / अनगाव
कमळाचे चिन्ह बाजूला ठेवून इतर पक्षातील निवडून येण्याच्या क्षमतेचे नेते एकत्र करून भाजपा करत असलेली आघाडी आणि समाजवादी पक्ष, काँग्रेस यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आघाडीपैकी कोणत्याही आघाडीत सहभागी न होता शिवसेना स्वबळावर लढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी काही दिवसांत भिवंडीत राजकीय भूकंप होईल, असे सूतोवाच करत शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या आक्रमक वाटचालीचे संकेत दिले.
भिवंडीच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ््या पक्षांची तयारी सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याने थेट घडामोडी सुरू नसल्या तरी पक्षांच्या कार्यालयात इच्छुकांची वर्दळ सुरू झाली आहे. नेते, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समर्थकांसह योग्य ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग होता. यंदा चार प्रभागांचा एक प्रभाग असल्याने त्या दृष्टीने उमेदवारांचे कसे पॅकेज असावे, याची चाचपणी सुरू आहे.
भिवंडीत शिवसेनेचे १६, पुरस्कृत दोन आणि एक स्वीकृत असे सध्या १९ नगरसेवक आहेत. पालिका क्षेत्रातील दोनपैकी एक आमदार शिवसेनेचा आहे आणि दुसऱ्या मतदारसंघातही शिवसेनेचे बळ वाढलेले आहे.
त्यामुळे मागील वेळेपेक्षा चमकदार कामगिरी करता येईल, या अपेक्षेतून शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.
कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई या महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे निवडून येण्याच्या क्षमतेवर इतर पक्षातील नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने आपली ताकद वाढवली, तसाच प्रयोग भिवंडीतही करण्याची तयारी सुरू आहे. भाजपासोबत यापुढे राज्यात कुठेही युती केली जाणार नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने शिवसेनेची राजकीय वाटचाल स्पष्ट असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.