The eagle trapped in the cat got life | मांजात अडकलेल्या गरुडाला मिळाले जीवनदान

मांजात अडकलेल्या गरुडाला मिळाले जीवनदान

भिवंडी : मकरसंक्रांतीत मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. या पतंगांसाठी चायनीज मांजाचा वापर केला जात असल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होतात. काही वेळा हा मांजा जीवघेणाही ठरतो. पक्ष्यांसाठीही हा मांजा घातक असून भिवंडीत अशाच मांजात अडकलेल्या गरुडाला शालेय विद्यार्थ्यांनी जीवदान दिले.शहरातील पटेलनगर येथे असलेल्या एका जुन्या वृक्षावर चार दिवसांपूर्वी पतंगाच्या मांजात एक गरुड अडकून पडला होता. याच परिसरात असलेल्या अमीन आर्केड या निवासी संकुलात राहणाऱ्या यासिर आमिर शेख या मुलाच्या निदर्शनास गरुड दिसल्याने त्याने गरुडाला मांजातून सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र झाडाची उंची ६० ते ७० फूट असल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले. 

पक्षिप्रेमी असलेल्या यासिरने ही घटना वडील आमिर शेख यांना सांगितली. शेख यांनी तत्काळ भिवंडी अग्निशमन दलास माहिती दिली असता जवानांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गरुडाची मांजातून सुटका करण्यात यश आले. दोन दिवसांपासून मांजा पायाला गुंडाळल्याने गरुडाच्या पायाला मोठी जखम झाली होती. यासिर याने अग्निशमन दलाच्या जवानांकडे गरुडाला आपल्या घरी नेण्याची विनंती केली. यासिरच्या पक्षिप्रेमाखातर जवानांनी जखमी गरुडाला यासिरकडे सुपूर्द केले.  घरी आणल्यावर त्याने गरुडाची मांजातून सुटका केली. उपचारानंतर यासिरने त्या गरुडाला अलगदपणे आकाशात सोडले. गरूडाने आकाशात घेतलेली झेप पाहून यासिर व त्याच्या मित्रांनी मनापासून आनंद व्यक्त केला.

 

Web Title: The eagle trapped in the cat got life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.