रविवारी उडाला प्रचाराचा धुरळा
By Admin | Updated: February 13, 2017 05:05 IST2017-02-13T05:05:37+5:302017-02-13T05:05:37+5:30
पुढच्या रविवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने एकमेव सुट्टीच्या दिवसाची पर्वणी साधत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी

रविवारी उडाला प्रचाराचा धुरळा
ठाणे : पुढच्या रविवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने एकमेव सुट्टीच्या दिवसाची पर्वणी साधत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी रविवारी मतदारांना गाठण्यासाठी दिवसभर धावपळ केली. प्रभागाचा आकार मोटा असल्याने अनेकांची अक्षरश: त्रेधा उडाली.
पॅनेलपद्धतीमुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यात उमेदवारांची दमछाक उडत आहे. अशातच कमी दिवस मिळाल्याने प्रत्येक मतदात्यापर्यंत पोहचण्यासाठी आता उमेदवारांची तारेवरची कसरत सुरु झाली आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीचा मुहुर्त साधून, उमेदवारांनी खऱ्या अर्थाने प्रचाराचा धडाका सुरु केल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाण्यात निवडणूक आहे, याची जाणीवही मतदारांना झाली.
प्रत्येक वॉर्डात ३५ हजारापासून ते ५९ हजारांपर्यंत मतदारांची संख्या आहे. त्यामुळे आठवडाभरात प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे आव्हान आहे. त्यामुळे गेले काही दिवस अतिशय मंद गतीने प्रचार सुरु असल्याचे चित्र दिसत होते. त्यातही प्रचारात झेंडे, गाड्या वापरण्यावर देखील बंधने आल्याने पूर्वीसारखा प्रचार होतांना दिसलेला नाही. असे असले तरी रविवार असल्याने जेवढा वॉर्ड पिंजून काढता येऊ शकतो, तेवढा पिंजून काढण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून अनेक ठिकाणी प्रचाराचा धडाका सुरु झाला. एखादे ठिकाण दूर असले तरी गाड्यांचा वापर करत पोचण्याची कसरत सुरू होती.
परंतु मतदारांपर्यंत पोचण्यास केवळ दोनच रविवार मिळत असल्याने त्याच काळात सर्वांना गाठण्यावर उमेदवारांचा भर होता.
मागणी प्रचंड वाढल्याने रविवारी प्रचारासाठी येणाऱ्या ‘कार्यकर्त्यांचा’ भावही वधारला होता. ५०० च्या ठिकाणी ७०० ते एक हजारांपर्यंतचे दर प्रचारासाठी उतरलेल्या कार्यकर्त्यानी आकारले होते. त्यातही कार्यकर्त्यांनी घरी जाऊ नये म्हणून त्यांना चहा, नाष्टा, व्हेज-नॉन व्हेज बिर्याणी असा सकाळ, दुपारचा बेत होता. तर सायंकाळीही चहा-नाष्टा आणि पुन्हा जेवणाची तयारी होती.
त्यातही प्रचार सुरू असताना कार्यकर्त्यांचा जेवणात वेळ जाऊ नये, यासाठी मोठ-मोठ्या डब्यातूनच हा मेनू कार्यकर्त्यांच्या हाती देण्यात आला होता. काही ठिकाणी यासाठी स्पेशल गाड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रचाराचा धुरळा उडत होता. (प्रतिनिधी)