लॉकडाऊनकाळात फिटनेससाठी ठाणेकर वळले सायकलिंगकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:38 AM2020-09-20T01:38:33+5:302020-09-20T01:44:43+5:30

संडे अँकर । वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय : फिटनेस, प्रशिक्षकांनी दिली माहिती

During the lockdown, Thanekar turned to cycling for fitness | लॉकडाऊनकाळात फिटनेससाठी ठाणेकर वळले सायकलिंगकडे

लॉकडाऊनकाळात फिटनेससाठी ठाणेकर वळले सायकलिंगकडे

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉकडाऊनकाळात जिम आणि व्यायामशाळा बंद असल्याने फिटनेससाठी ठाणेकरांनी सायकलिंगवर भर दिला आहे. अनलॉकनंतर अद्याप जिम-व्यायामशाळा सुरू न झाल्याने आपले शरीर फिट ठेवण्यासाठी तसेच लॉकडाऊनमध्ये वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी ठाणेकरांचा कल याकडे वाढला असून सर्वांगीण व्यायाम म्हणून त्यांनी सायकलिंगला पसंती दिल्याचे निरीक्षण फिटनेस प्रशिक्षकांनी नोंदविले.
आजच्या जीवनशैलीत फिटनेसचे महत्त्व वाढले आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिटनेस हवा आहे. त्यामुळे अनेक जण जिमकडे वळतात. लोकांची गरज लक्षात घेऊन अलीकडच्या काळात मोठ्या-मोठ्या जिमही उभ्या राहिल्या. कोरोनामुळे जिम-व्यायामशाळा बंद झाल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी घरगुती व्यायामावर भर दिला. कोणी आॅनलाइन मार्गदर्शन तर कोणी यूट्युबवर व्हिडीओ पाहून व्यायाम करीत होते. पण त्यात सातत्य राखणे प्रत्येकाला शक्य नसते.

महिलांचाही वाढला ओढा
महिला वर्गाला तर वजनवाढीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सतावू लागला. त्यामुळे अनलॉक सुरू झाल्यानंतर हळूहळू बाहेर पडणे सुरू झाले तसे फिटनेसकडे ठाणेकर पुन्हा वळले. बंद झालेला व्यायाम पुन्हा सुरू करण्यासाठी सायकलिंगकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहू लागले. त्यामुळे हळूहळू सायकलिंगचे महत्त्व पटू लागल्याने लॉकडाऊनचा काळ सायकलिंगसाठी कारक ठरला आणि ठाणेकरांनी व्यायाम म्हणून त्याकडेच ओढा वाढविला.
तरुण मंडळींचेही सायकलिंगला प्राधान्य
फिटनेससाठी सायकलिंग निश्चितच उपयोगी आणि परिणामकारक आहे. उत्तम आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. ३० ते ५० वयोगटांतील वर्गामध्ये सायकलिंगची आवड वाढली आहे.

सायकलिंगमुळे हृदयाची, स्नायूंची क्षमता, रोगप्रतिकार क्षमता वाढते. २० वर्षांपूर्वी कामाला जाण्यासाठी सायकलचा भरपूर वापर होत असे तो अलीकडच्या काळात कमी झाला होता. पण लॉकडाऊनच्या काळात पुन्हा वाढल्याचे दिसून येते. येऊर, उपवन, घोडबंदर रोड या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत सायकलपटूंची संख्या अधिक दिसून येते. रस्त्यावर सायकल चालविण्याचा फायदा कितीतरी पटीने अधिक आहे. पँडलिंग करताना पायाची हालचाल अधिक होते. हृदय आणि मांडी यांच्यात अंतर जास्त आहे. जिथे स्नायूंची हालचाल जास्त होते तिथे हृदय रक्तपुरवठा करीत असते. चालण्यापेक्षा सायकलिंमध्ये जास्त फायदा आहे, वजनही लवकर कमी होते.
- विनोद पोळ, जिम प्रशिक्षक
सायकलमुळे कार्डिओ वर्कआउट होतो. सहनशक्ती, तग धरण्याची क्षमता वाढते. भूक लागते, वजन कमी होते. हृदय आणि फुप्फुसासाठी सायकलिंग केव्हाही चांगले. सायकलिंग करताना संतुलित आहारही महत्त्वाचा आहे.
- मंदार आगवणकर, सचिव, मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशन

लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच ठाणेकर सायकलिंगकडे वळले आहेत. यामध्ये सर्वच वयोगटांतील ठाणेकरांचा समावेश दिसून येत आहे. विशेषत: सुटीच्या दिवसांत ठाणे आणि मुंबई परिसरात सकाळच्या वेळी अनेक रस्त्यांवर सायकलिस्टची संख्या अधिक आहे. याचाच परिणाम म्हणून अलीकडच्या काळात सायकलला प्रचंड मागणी वाढलेली दिसून येत आहे. विशेषत: हायब्रीड आणि रोड सायकलला मागणी वाढल्याने तुटवडा जाणवतो आहे. हायब्रीड सायकलसाठी तर जास्त वेटिंग करावे लागत आहे. मला एक निरीक्षण मुद्दाम नोंदवावेसे वाटते की दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळेसुद्धा अनेक जण सायकलकडे वळाले आहेत.
- प्रा. नारायण बारसे,
सायकलपटू

Web Title: During the lockdown, Thanekar turned to cycling for fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.