कोरोना काळात ठाण्यात ३० हजार फेरीवाले वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:44+5:302021-09-02T05:27:44+5:30
ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर केलेल्या हल्ल्यानंतर, आता ठाणे महापालिका ...

कोरोना काळात ठाण्यात ३० हजार फेरीवाले वाढले
ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर केलेल्या हल्ल्यानंतर, आता ठाणे महापालिका फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी ठामपा कृती आराखडा तयार करणार आहे. कोणत्या भागात अधिक फेरीवाले बसतात, ते स्पॉट शोधून त्याठिकाणी संपूर्ण दिवसभर कशापद्धतीने कारवाई करता येईल, याची माहिती घेऊन आयुक्तांच्या मंजुरीनंतर दोन दिवसात पुढील दिशा ठरविली जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत तब्बल ३० हजार फेरीवाले नव्याने वाढले असल्याने त्यांचा शोध घेऊन ही कारवाई कशी करणार, याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरणानुसार केलेल्या सर्व्हेत पाच हजार १४१ फेरीवाल्यांची नोंदणी केली आहे. परंतु, शहरात सध्याच्या घडीला वाढीव ३० हजार फेरीवाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात आता सहायक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील फेरीवाल्यांवर कारवाईसाठी ठामपाला जाग आली आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. आता त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे हे काम हाती घेतले आहे. त्यानुसार कोणत्या भागात अधिकचे फेरीवाले आहेत, ते स्पॉट शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात हा ॲक्शन प्लॅन तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई तीव्र केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव पथक उपायुक्त अश्विनी वाघमाळे यांनी दिली.
फेरीवाले पळाले
सहायक आयुक्तांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यांवरील कारवाई जोरात सुरू केल्याने शहरातील प्रमुख रस्ते फेरीवालामुक्त बनल्याचे दिसून आले आहे. तसेच फेरीवालेदेखील अनेक भागातून पळाले आहेत.