कचरा संकलन केंद्राचे झाले डम्पिंग; संजयनगरमध्ये रहिवाशांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:44 PM2018-12-10T23:44:19+5:302018-12-10T23:44:49+5:30

केंद्र हटवण्याची मागणी; धुराचा त्रास, रोगराईचा धोका

Dump collection center gets dumped; Residents of Sanjaynagar fast | कचरा संकलन केंद्राचे झाले डम्पिंग; संजयनगरमध्ये रहिवाशांचे उपोषण

कचरा संकलन केंद्राचे झाले डम्पिंग; संजयनगरमध्ये रहिवाशांचे उपोषण

Next

डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंगचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे २७ गावांमधील कचरा संकलन केंद्र असलेल्या सागाव येथील संजयनगर परिसराला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. दुर्गंधी, धुराचा त्रास आणि रोगराईचा धोका निर्माण झाल्याने ते तत्काळ हटवावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. रिपब्लिकन सेनेच्या पुढाकाराने सोमवारपासून रहिवाशांनी त्यासाठी उपोषण छेडले आहे. केंद्र हटविले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान, दोन महिन्यांत केंद्र हटवण्याची प्रक्रिया केली जाईल, असे केडीएमसीचे लेखी आश्वासन रहिवाशांनी अमान्य केले आहे.

केडीएमसीतील २७ गावांचा कचरा संजयनगरमधील मोकळ्या भूखंडावर एकत्र गोळा केल्यानंतर तो कल्याणमधील आधारवाडी डम्पिंगकडे नेला जातो. परंतु, या संकलन केंद्रावर गोळा केला जाणारा कचरा योग्यप्रकारे उचलला जात नसल्याने ८० टक्के कचरा जैसे थे पडून असतो. यामुळे दुर्गंधी पसरतेच पण त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. हा कचरा जाळला जात असल्याने धुराने रहिवाशांची घुसमट होत आहे. या भागात शाळा व महाविद्यालयेही असल्याकडे उपोषणकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. हे संकलन केंद्र बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. पाच डिसेंबरपर्यंत कार्यवाही व्हावी, असे पत्रात म्हटले होते. परंतु, कार्यवाही न झाल्याने उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला, अशी माहिती रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडी डोंबिवली अध्यक्षा गोगल मंगे यांनी दिली. मंगे यांच्यासह नंदा ढेकळे, सत्यकला गायकवाड, निर्मला कुºहाडे, प्रफुल्ल पाठारे, किशोर इल्लाळे, लक्ष्मण चव्हाण आणि अन्य पदाधिकारी, रहिवासी सहभागी झाले होते.

दरम्यान, केडीएमसीचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन महिन्यात केंद्र बंद करतो, उपोषण मागे घ्या, असे पत्र जोशी यांनी दिले. परंतु, उपोषणकर्त्यांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील या देखील होत्या. उपोषणकर्त्यांशी त्यांनीही चर्चा केली. पण त्यांचेही म्हणणे ऐकले नाही.

तत्काळ कार्यवाही व्हावी
डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील संजयनगरमधील रहिवासी ११ वर्षे या डम्पिंगचा त्रास सहन करत आहेत.
केडीएमसीकडे वारंवार पत्रव्यवहार करून त्यांनी हे डम्पिंग हटविण्याची मागणी केली होती.
मात्र, केडीएमसीचे अधिकारी डम्पिंग बंद करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागत आहेत. ते आम्हाला मान्य नसून तत्काळ कार्यवाही व्हावी, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे उपोषणकर्ते प्रफुल्ल पाठारे यांनी सांगितले.

Web Title: Dump collection center gets dumped; Residents of Sanjaynagar fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.