जलवाहिनी फुटल्याने खडवलीत ठणठणाट
By Admin | Updated: May 9, 2017 00:55 IST2017-05-09T00:55:29+5:302017-05-09T00:55:29+5:30
कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा खडवली येथील रस्ता खोदल्याने जलवाहिनी फुटली आहे.

जलवाहिनी फुटल्याने खडवलीत ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा खडवली येथील रस्ता खोदल्याने जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे खडवलीत मागाली १२ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी उन्हाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहेत. त्यात खडवली रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठ ते वडाचाटेप हा रस्ताही आहे. हा रस्ता काँक्रिटीकरणासाठी १२ दिवसांपूर्वी खोदण्यात आला. त्यात खडवली बाजारपेठ व गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. ग्रामपंचायतीने दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हाकेच्या अंतरावर भातसा नदी असतानाही पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. आंघोळ, कपडे धुवण्यासाठी त्यांना नदीवर धाव घ्यावी लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील व्यापारी अरुण पितांबरे यांनी केली. या संदर्भात ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.