रेतीउपशामुळे खाडीत गाळाचे साम्राज्य; वेगही मंदावलेला

By Admin | Updated: April 24, 2017 02:15 IST2017-04-24T02:15:31+5:302017-04-24T02:15:31+5:30

ठाणेअंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण

Due to sandstorm; Velocity flurry | रेतीउपशामुळे खाडीत गाळाचे साम्राज्य; वेगही मंदावलेला

रेतीउपशामुळे खाडीत गाळाचे साम्राज्य; वेगही मंदावलेला

ठाणेअंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-बोरिवली या मार्गांवर जलवाहतूक सेवा प्रस्तावित करण्यात येणार आहे. या जलवाहतूक प्रकल्पाचे मुख्य वाहतूक केंद्र कोलशेत येथे बनवण्यात येणार असून या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, पार्किंग व्यवस्था, तिकीट काउंटरसह सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव या सर्व महापालिकांच्या वतीने बनवण्यात येणार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्यानुसार गायमुख येथे जेटी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच त्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे तसेच ते स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या खाडीला मिळणाऱ्या नाल्याची अरुंद मुखे वाढवण्याबाबतही पालिकेने पावले उचलली आहेत. सध्या मुंबई आणि नवी मुंबईला या जलवाहतुकीतून वगळण्यात आले असले, तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांना ही जलवाहतूक जोडली जाणार आहे. मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तिन्ही स्तरांवर ही वाहतूक सुरू होणार असल्याने रेल्वे आणि रस्त्यांवरील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण मात्र कमी होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
एकूणच ठाणे महापालिकेची ही सुंदर संकल्पना असली, तरी यामध्ये आजही काही महत्त्वाच्या अडचणी आहेत. त्या दूर करणे पालिकेला क्रमप्राप्त आहे. कोलशेत ते थेट घोडबंदर-गायमुखपर्यंत खाडी परिसर बऱ्यापैकी चांगला असला तरीही येथे बेसुमार रेतीउपसा सुरू असून याकडे आजही दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंब्य्राच्या पुढील भागात रेतीउपसा करण्यावर पायबंद घातला जात असताना घोडबंदरच्या भागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहणीत दिसून आले. दिवसाढवळ्या येथे रेतीउपसा सुरू असतो. जास्तीचा रेतीउपसा झाल्याने खाडीत गाळ साचला असून हा गाळ काढण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे किंबहुना कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांपुढे असणार आहे. मुंब्य्रापासून पुढे जाणाऱ्या खाडीत, तर बेसुमार रेतीउपसा झाल्याने खाडीचा मार्गच बदलला आहे. त्यामुळे खाडीचे पात्र रुंद झाले असून मागील काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची बोट खाडीत अडकली. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात खाडीचे पात्र रुंद झाल्याने आणि खाडीतील गाळ वाढल्याने खाडीचा वेग मंदावला असल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. किंबहुना, पाहणीतही अशीच बाब निदर्शनास आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून खारफुटीच्या कत्तलीमुळे खाडीची जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच खाडीत मागील कित्येक वर्षांपासून सोडल्या जात असलेल्या दूषित पाण्यामुळेही जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालिकेने जलवाहतूक सुरू करताना किंवा इतर महापालिकांनीदेखील या सर्व बाबींचा विचार करून खाडीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असल्याचे मत खाडीच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. खाडीचा मंदावलेला वेग वाढवला तरच जलवाहतूक लाभदायक ठरेल, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Due to sandstorm; Velocity flurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.