नाटकांमधील भूमिकांमुळे अभिनयाचा पाया होतो भक्कम

By Admin | Updated: June 29, 2017 02:43 IST2017-06-29T02:43:49+5:302017-06-29T02:43:49+5:30

एखाद्या कलाकाराला करिअरच्या पहिल्या टप्प्यात मालिकांमध्ये काम मिळाल्यानंतर तसेच चांगले काम पुन्हा मिळेलच असे नाही.

Due to the roles in dramas, the role of acting is strong | नाटकांमधील भूमिकांमुळे अभिनयाचा पाया होतो भक्कम

नाटकांमधील भूमिकांमुळे अभिनयाचा पाया होतो भक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एखाद्या कलाकाराला करिअरच्या पहिल्या टप्प्यात मालिकांमध्ये काम मिळाल्यानंतर तसेच चांगले काम पुन्हा मिळेलच असे नाही. कधीकधी त्याला अन्य मालिकांमध्ये दुय्यम भूमिका मिळते, भावही कमी होतो. त्यामुळे त्यांना नैराश्य येते. मालिकांमध्ये भूमिका मिळाली म्हणून शेफारून जाऊ नका. नाटकात प्रथम काम मिळाले, तर त्या कलाकाराला कधीच मरण येत नाही. नाटकांमुळे त्याच्या अभिनयाचा पाया पक्का होतो, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, डोंबिवली शाखेचा युवा विभाग आणि वेध अ‍ॅकॅडमी यांच्यातर्फे ‘अभिव्यक्ती’ उपक्रमांतर्गत जोशी यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम नुकताच आनंद बालभवन येथे झाला. अभिव्यक्ती उपक्रमाचे दहावे पुष्प जोशी यांच्या मुलाखतीने गुंफण्यात आले. सुप्रसिद्ध नाट्य लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी जोशी बोलत होते.
जोशी म्हणाले की, युवकांनी प्रथम मालिकेत काम केले आणि ती व्यक्तिरेखा गाजली की, लगेचच गाडी, घर घेऊ नये. मालिकांमध्ये काम करून नंतर नैराश्य आल्यावर अनेक घरे उद्ध्वस्त झालेली मी पाहिली आहेत. या इंडस्ट्रीत उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. तो मावळतीकडे गेला की, त्याला रामराम ठोकला जातो. आज अनेक कलाकार असे आहेत की, त्यांना त्यांच्या उपचारासाठीही पैसे नसतात. ‘एफटीआय’सारख्या संस्था खूप मोठ्या आहेत. त्यांच्या मोठेपणाविषयी कोणताच वाद नाही. पण, अभिनय हा शिकून येत नाही. त्यासाठी सरावाची गरज आहे. प्रॉक्टिकल फार महत्त्वाचे आहे. माइकवर बोलण्याचा सराव करा. या क्षेत्रात तुम्हाला जमत असेल, तरच काम करा, नाहीतर हे क्षेत्र सोडून द्या. चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेतले आणि अंगभूत कला असली, तरी नशीब साथ देईलच, असे नाही. त्यामुळे नशिबाची साथ असेल, तरच यश मिळते. माझ्या नशिबाने मला कायम साथ दिली. माझ्याही आयुष्यात उतार आले. त्या काळात मी आठ वर्षे मागे फेकला गेलो होतो. खचून न जाता मी पुढे जात राहिलो. कोणी आपल्याला नावे ठेवली, तरी मागे हटू नका. जो चांगले काम करतो, त्याच्याकडूनच चुका होतात. चूक झाली तर मान्य करा. त्यातही मनाचा मोठेपणा असतो.
नाट्य परिषदेला राजाश्रयाची गरज आहे. दीपक करंजीकर यांच्यासारखी मोठी व्यक्ती परिषद सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांना टाळू नका. ही मंडळी कामात खूप व्यस्त असते. त्यांना असे कार्यक्रम करून दाखवा की, ते तुमच्याकडे आकृष्ट होतील. त्यांच्या पाठीशी असणे हेदेखील खूप महत्त्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
लहान असताना आम्ही वाड्यात राहत होतो, तेव्हा वेगवेगळे आवाज काढायचो, नकला करायचो. बंडखोर असल्याने वडिलांनी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात नेऊन टाकले. तिथूनच अभिनयाचा प्रवास सुरू झाला. जी नाटके कळत नाहीत, त्यांनाच प्रायोगिक नाटके असे म्हणतात. ज्या नाटकातील भाव लोकांना कळत नाही, ती नाटके करू नयेत. ‘मोरूची मावशी’ हे नाटक करताना मला मुरलीधर राजूरकर यांची मदत झाली. माझ्या आईला मोरूची मावशीपेक्षा ‘नाथ हा माझा’मधील ड्रायव्हरची भूमिका जास्त आवडत होती. ड्रायव्हिंग मला खूप आवडते. ती एक कला आहे.
या प्रसंगी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मधुकर चक्रदेव, माधव जोशी, दिलीप खन्ना, समीर जगे, नंदू गाडगीळ, दिलीप गुजर, संकेत ओक, मधुरा ओक, दीपाली काळे, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Due to the roles in dramas, the role of acting is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.