सवलतीच्या वाहनखरेदीसाठी ठाण्यात तोबा गर्दी
By Admin | Updated: April 1, 2017 06:06 IST2017-04-01T06:06:51+5:302017-04-01T06:06:51+5:30
सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदीविक्रीवर

सवलतीच्या वाहनखरेदीसाठी ठाण्यात तोबा गर्दी
ठाणे : सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजीन असलेल्या वाहनांच्या खरेदीविक्रीवर उद्या १ एप्रिलपासून बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी या वाहनांच्या खरेदीकरिता विशेष सवलत जाहीर केली होती. त्यामुळे ठाण्यातील वेगवेगळ्या शोरूममध्ये वाहनखरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. ठाणेकरांचा खरेदीचा उत्साह इतका दांडगा होता की, शोरूममालकांनी सवलतीच्या दरातील वाहनांचा साठा संपल्याचे सांगितल्याने खरेदीसाठी आलेल्यांची घोर निराशा झाली.
कल्याण-डोंबिवलीतही ठाण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनांच्या नोंदणीची वेळ आरटीओने कमी केल्याने शोरूममालकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहण्यास मिळाले.
वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होते. बीएस-४ हे कमीतकमी वायुप्रदूषण करणारे इंजीन असून तेच न्यायालयाने वाहनांसाठी बंधनकारक केले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांची झोप उडाली आहे. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदीविक्र ी होऊ शकणार नसल्याने विविध वाहन कंपन्यांनी दुचाकींवर हजारो रुपयांची, तर चारचाकी वाहनांवर लाखो रुपयांची सवलत जाहीर केली. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील होंडा शोरूममध्ये वाहनखरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकाच गर्दी झाल्याने जणू जत्रेसारखी परिस्थिती उद्भवली. दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाणेकरांनी वाहनखरेदीचा उत्साह दाखवला होता. त्यावेळी मूळ किमतीत ज्यांनी ही वाहने खरेदी केली, त्यांना आजचे सवलतीचे दर ऐकून चुटपुट लागली. एखादा साड्यांचा सेल लागल्यावर जशा उड्या पडतात, तशाच पद्धतीने ठाणेकरांनी शुक्रवारी वाहने खरेदी केल्याने नोटाबंदी, महागाई वगैरे यासारखे विरोधकांकडून बोलले जाणारे मुद्दे किती फिजूल आहेत, याची साक्ष मिळाली. ठाण्यातील होंडाच्या शोरूममधून मागील २ दिवसांत जवळपास ५०० गाड्यांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले, तर कल्याणमधील वाहनांच्या शोरूमालकाने दिवसभरात ७५ वाहनांची विक्री झाल्याचे सांगितले. डोंबिवलीत शोरूमबाहेर बीएस-३ ची वाहने उपलब्ध नसल्याचे फलक लावल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत १३०० वाहनांची नोंदणी
ठाणे आरटीओमध्ये आॅनलाइन पद्धतीने १३०० वाहननोंदणी झाली आहे. गुढीपाडव्याला ३४५ वाहनांची नोंदणी झाली होती.यामध्ये सर्वाधिक २६३ दुचाकींचा समावेश होता. २९ मार्चला २८६ वाहने नोंदली गेली.
मात्र, बीएस-३ इंजीन असलेल्या वाहनांना बंदी झाल्याने ३० मार्चला ६७५ वाहनांची नोंदणी झाली.त्यामध्ये ३९४ दुचाकी, तर १०८ चारचाकी वाहनांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे आज (३१मार्चला) रात्री ८ वाजेपर्यंत ५६३ वाहनांची नोंदणी झाली होती. यामध्ये ३३१ दुचाकी, तर १०३ चारचाकी १२९ अवजड वाहनांची नोंदणी झाली असून ही नोंदणी वाढण्याची शक्यता आरटीओने वर्तवली आहे.