‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत

By Admin | Updated: October 6, 2015 00:34 IST2015-10-06T00:34:42+5:302015-10-06T00:34:42+5:30

रसिकांच्या मनाला ज्या आवाजाने तीन दशके भुरळ घातली त्या जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडणारा ‘स्वरानंद’ प्रस्तुत ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम

Due to the program 'Sumanasagand', drought relief help | ‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत

‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत

ठाणे: रसिकांच्या मनाला ज्या आवाजाने तीन दशके भुरळ घातली त्या जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडणारा ‘स्वरानंद’ प्रस्तुत ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम १० आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात होणार आहे. ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमातूनच दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाऊंडेशनला निधी दिला जाणार आहे. ‘लोकमत’च्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांसाठी ‘अथर्व एंन्टरटेन्मेंट’ आणि ‘स्वरानंद’ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सुमनसुगंध’ ही संकल्पना जेष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांची असून त्याचे आयोजन कर्जतच्या ‘अथर्व एंन्टरटेन्मेंट’ यांनी केले आहे. या कार्यक्रमात सुमनतार्इंशी मंगला खाडीलकर या मनमोकळा संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांना आवडलेली काही निवडक गाणी त्या गाणार आहेत. तसेच उर्वरित गाण्यांची धुरा माधुरी करमरकर, विद्या करगिलकर आणि मंदार आपटे हे सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले आहे. यावेळी ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते कल्याणपूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळतोय आणि या दुष्काळग्रस्तांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी संवेदनशील रंगकर्मी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे,’ हे कृतीतून दाखवून दिले. आता या कार्यक्रमातून निधी संकलन करुन दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ संस्थेकडे द्यावा, अशी संकल्पना ‘अथर्व’ एंटरटेंन्मेटचे प्रसाद कारुळकर यांनी मांडली.
या संकल्पनेला ‘स्वरानंद’च्या हर्षदा शिंदे, स्वरा शिंदे आणि संदीप सावंत यांनी दुजोरा दिला. लोकमतनेही ‘काहीतरी कर ठाणेकर’ हा उपक्रम राबविल्याने या कार्यक्रमाची त्याला जोड दिल्याचे कारुळकर म्हणाले. कार्यक्रमाला ‘अनुदान प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि ‘रचना कन्स्ट्रक्शन’ यांचे सहकार्य मिळाल्यामुळे हा कार्यक्रम विनामूल्य सादर करण्याचे बळ मिळाल्याचेही ते म्हणाले. यावेळी ‘अनुदान’चे नटेश शिंदे आणि सुब्रमण्यम शिंदे हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मदतीची पेटी...
कार्यक्रम विनामूल्य घोषित केल्यानंतर ‘नाम’ फाऊंडेशनची निर्मिती झाली. त्यामुळे ज्या दात्यांना दुष्काळग्रस्तांसाठी मदत करायची आहे, त्यांनी कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या पेटीत स्वेच्छेने आर्थिक मदत करावी. मध्यंतरानंतर ‘नाम’ च्या सभासदाकडे ती सुपूर्द केली जाणार आहे. याच मदतीतून दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न असल्याचे कारुळकर म्हणाले.

Web Title: Due to the program 'Sumanasagand', drought relief help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.