Due to the oppressive conditions of age, there was a time of starvation for thousands of homeguards | वयाच्या जाचक अटीमुळे दाेन हजार  होमगार्ड्सवर आली उपासमारीची वेळ

वयाच्या जाचक अटीमुळे दाेन हजार  होमगार्ड्सवर आली उपासमारीची वेळलोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) ५०हून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो, असे गृहीत धरून राज्य सरकारने गेल्या १३ महिन्यांपासून बंदोबस्तासारखे काम देणे बंद केले आहे. त्यामुळे या दोन हजार कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वयाची ही अट शिथिल करून ठाणे जिल्ह्यातील शेकडो जवानांना पुन्हा कामावर रुजू करावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी होमगार्डचे राज्याचे महासमादेशक परमबीर सिंह यांना घातले आहे.


ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांनी महासमादेशकांना दिलेल्या आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, होमगार्डचे जवान हे पगारी नोकर नाहीत. मानसेवी संघटनेत ते कार्यरत आहेत. परंतु, अनेकांची २० वर्षांहून अधिक सेवा झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कार्यकाळापासून संचारबंदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील नऊ हजार ५००पेक्षा अधिक होमगार्डच्या जवानांनी सेवा दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये नऊ हजार ५०० पैकी तब्बल दोन हजार जवानांना एकदाही काम देण्यात आले नाही. त्यांनी जिल्हा कार्यालयात विचारणा केली तर तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तीन तीन महिने उशिराने भेटणाऱ्या मानधनावरच या जवानांचे संसार चालतात. पण आता तेही बंद झाले. 


एकीकडे कोरोनाकाळात अनेकांची कामे बंद झाली. सध्या दुकानेही बंद आहेत. त्यामुळे इतरत्र कुठेही काम किंवा खासगी नोकरीही करता येत नाही. कामच मिळत नसेल तर या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जे शरीराने तंदुरुस्त असतील त्यांना तरी बंदोबस्ताची कामे दिली जावीत. ५०पेक्षा जास्त वयोगटातील असूनही पोलिसांना बंदोबस्त किंवा सर्व प्रकारची कामे दिली जात असतील तर हाच न्याय होमगार्डच्या जवानांनाही दिला जावा, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

गेल्यावर्षी मार्चपासून रेल्वे, वाहतूक आणि शहरातील सर्व बंदोबस्तावरील ५०पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना काम देण्यात आलेले नाही. निवृत्तीपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या या कठीण काळात कामे दिली जावीत.
- होमगार्ड जवान, 
ठाणे.

Web Title: Due to the oppressive conditions of age, there was a time of starvation for thousands of homeguards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.