डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण
By Admin | Updated: October 5, 2015 00:32 IST2015-10-05T00:32:18+5:302015-10-05T00:32:18+5:30
कळंबोली परिसरातील रोडपाली येथे सिडकोकडून नियोजनबध्द विकास करण्यात आला आहे. याठिकाणी अनेक टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्या

डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण
कळंबोली : कळंबोली परिसरातील रोडपाली येथे सिडकोकडून नियोजनबध्द विकास करण्यात आला आहे. याठिकाणी अनेक टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्या तरी स्वच्छतेअभावी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून सिडकोकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत.
तळोजा लिंक रोडलगत सिडकोने कळंबोली नोडमधील रोडपाली विभागाचा विकास केला आहे. या ठिकाणी प्रशस्त रस्ते, गटारांची सोय आहे. त्याचबरोबर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र परिसरातील खाडी, मोकळ्या भूखंडावर वाढलेले गवत, डास प्रतिबंधात्मक फवारणीचा अभाव, आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. १७ ते २0 या सेक्टरमध्ये जवळपास १00 सोसायट्या असून काही भूखंडावर बांधकाम सुरू आहे. या सगळ्या सोसायटीतील रहिवासी डासांच्या प्रादुर्भावाने त्रस्त असून अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. याबाबत सिडकोकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही किंवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. (प्र्रतिनिधी)नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला क्रीडांगणाकरिता एक दहा एकराचा भूखंड राखीव आहे. या ठिकाणी झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. रोडपालीतील फेरीवाले आपला सगळा कचरा येथेच आणून टाकतात. त्याचबरोबर कामगारांनी या जागेवर झोपड्या थाटल्या असून ते शौचास बसतात. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. सोसायटीत डेंग्यूने एक बळी सुध्दा गेला आहे. भूखंडावर गवत कापून साफसफाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.