गणेशोत्सव मंडळांकडून हरताळ
By Admin | Updated: September 11, 2015 00:53 IST2015-09-11T00:53:18+5:302015-09-11T00:53:18+5:30
महापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे.

गणेशोत्सव मंडळांकडून हरताळ
- अजित मांडके, ठाणे
महापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेची मंडळे आघाडीवर असून त्यांनी एक चतुर्थांशऐवजी अर्ध्याहून अधिक रस्ताच वाहतुकीसाठी बंद करणारे मंडप उभारले आहेत. परंतु, पालिकेकडून अद्याप एकाही मंडळावर कारवाई न झाल्याने आचारसंहितेच्या बागुलबुवाची स्टंटबाजी करतात तरी कशाला? असा सवाल आता ठाणेकरांनी केला आहे.
पाचपाखाडी भागात नरवीर तानाजी मित्र मंडळाने अर्धा रस्ता अडवून मंडप उभारणीला सुरुवात करण्यापूर्वीच शिवसेनेच्या अनेक मंडळांनीही शहरात रस्त्यांवर ते थाटण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या चंदनवाडी मित्र मंडळाने यंदाही रस्त्याचा अर्धा भाग मंडपासाठी व्यापल्याने येथील वाहतुकीवर ताण येऊ लागला आहे.
दुसरीकडे घोडबंदर भागातील खेवरा सर्कलमध्ये तर शिवसेनेच्या एका नेत्याने मंडपासह मूर्तीचीही दिशा बदलून अर्धा रस्ता व्यापला आहे. तर, काजूवाडी भागातही अर्ध्या रस्त्यावरही शिवसेनेच्या दुसऱ्या एका नेत्याने मंडपाचा पसारा मांडला आहे. वागळे इस्टेट भागात तर नाल्यावरच मंडप उभारला असून किसननगरसह इतर भागातही अशा प्रकारे मंडप उभारले जात आहेत. परंतु, पाया उभारण्यापासून ते संपूर्ण मंडप उभारेपर्यंत एकाही पालिका अधिकाऱ्याचे त्याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे महापालिकेने आचारसंहिता तयार करून रस्त्याच्या एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के जागेतच मंडप उभारणीला परवानगी देण्याचे धोरण महासभेत सर्वपक्षीयांचा विरोध डावलून मंजूर करून घेतले.
परंतु, असे असतानादेखील पालिकेला दहीहंडी उत्सवात याची अंमलबजावणी करता आली नाही. तर, आता गणेशोत्सवातही पालिकेच्या नाकावर टिच्चून
शहरात अनेक मंडळांनी रस्त्यांवरच
मंडप उभारण्यास सुरुवात केली. मात्र, यावर कारवाई करण्याचे टाळून पालिकेनेच आपले धोरण बासनात गुंडाळले की काय, अशी चर्चा ठाणेकरांत सुरू झाली आहे.
पोलिसांचीही
बघ्याची भूमिका
महापालिकेच्या आचारसंहितेला ठाणे खाडीत बुडवून गणेशोत्सव मंडळांनी शहरातील अनेक रस्ते व्यापून वाहतुकीला अडथळे निर्माण केले आहेत. मात्र, पालिकेप्रमाणेच पोलिसांनीही त्याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. एरव्ही, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी या अनधिकृत मंडपांकडे काणाडोळा केल्याने ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.