फुटीच्या भीतीने ‘साई’चे नगरसेवक होणार भूमिगत
By Admin | Updated: March 21, 2017 01:59 IST2017-03-21T01:59:13+5:302017-03-21T01:59:13+5:30
महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून

फुटीच्या भीतीने ‘साई’चे नगरसेवक होणार भूमिगत
उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून आपल्या पक्षात मोठी फूट पडेल, या भीतीने साई पक्षाला ग्रासले आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नगरसेवक भूमिगत होण्याच्या तयारीत आहेत. त्यांना शहराबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तत्पूर्वी भाजपाकडून नेमकी कोणती पदे मिळतील, त्याबाबत चर्चा करण्यासाठी त्या पक्षासह अन्य मित्रपक्षांनी एकत्र बैठकही घेतली. त्यात साई पक्षाला उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद हवे असून त्याबबात अंतिम निर्णयझालेला नाही. एवढे महत्वाचे पक्ष साई पक्षाला देण्यास पक्षातून विरोध आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये आकड्यांची जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याने साई पक्षाची धास्ती वाढली आहे.
उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक ३ किंवा ५ एप्रिलला होणार आहे. महापौरपद मिळवण्यावरून भाजपा आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेने काँग्रेस, पीआरपी, भारिपाचे प्रत्येकी एक, रिपाइं आठवले गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ अशा ९ नगरसेवकांसोबत युतीची बोलणी केली. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ६ नगरसेवक कमी पडत असल्याने त्यांनी ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाला महापौरपदाची आॅफर दिली. साई पक्ष शिवसेनेच्या युतीत सामील न झाल्यास त्यातील एका गटाला महापौरपदाचे आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षात उभी फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यापुर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. त्यांचे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी चार जणाचे पॅनल निवडून आणले आहे. त्यांना शिवसेनेने गळाला लावण्याचे प्रयत्न केले आहेत.
महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. शिवसेना नुसता पाठिंबा देण्यास तयार नाही. त्यातच गेल्यावेळी रद सोडण्यास खळखळ केल्याने महापौर राजीनामानाट्य रंगले. त्यात साई पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की झाल्याने सिंधी समाजाच्या एका गटात शिवसेनेबाबत रोष असल्याचा साई पक्ष, भाजप आणि ओमी टीमचा दावा आहे.
साई पक्षाच्या आशा इदनानी यांनी महायुतीतील करारनाम्यानुसार महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या रागातून शिवसैनिकांनी आशा यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, नगरसेवक सुनील गंगवानी, भाजपाचे तत्कालीन आमदार कुमार आयलानी, नेते जमनुदास पुरस्वानी यांना मारहाण केली होती. तो राग काही नेत्यांच्या मनात कायम आहे. (प्रतिनिधी)