चव्हाणांमुळे डोंबिवलीला पुन्हा लाल दिवा
By Admin | Updated: July 8, 2016 03:38 IST2016-07-08T03:38:23+5:302016-07-08T03:38:23+5:30
राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी होणाऱ्या विस्तारात डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मागील युती सरकारच्या

चव्हाणांमुळे डोंबिवलीला पुन्हा लाल दिवा
डोंबिवली : राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी होणाऱ्या विस्तारात डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मागील युती सरकारच्या काळात जगन्नाथ पाटील हे मंत्री होते. त्यानंतर, तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा डोंबिवलीकडे लाल दिवा आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांपैकी डोंबिवलीतील चव्हाण हेच मंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार होते. ठाण्याचे आमदार संजय केळकर, कल्याण पश्चिमचे नरेंद्र पवार, मुरबाडचे किसन कथोरे आदी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत चव्हाण यांचा मंत्रिमंडळातील समावेश पक्का झाल्याने डोंबिवलीत त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी रात्रीपासून जल्लोष साजरा केला.
चव्हाण हे दुसऱ्यांदा निवडून आले असून ‘डोंबिवली’ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. २००९ च्या विधानसभेत युतीचे, तर २०१५ च्या निवडणुकीत ते भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर, आॅक्टोबर महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाली. त्यात त्यांच्याकडे निवडणूक प्रचारप्रमुख ही जबाबदारी पक्षाने सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली. भाजपाच्या ८ नगरसेवकांवरून ४२ एवढे संख्याबळ त्यांनी गाठले. त्यानंतर, कुडाळ नगर परिषदेची जबाबदारी पार पाडली. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ठाण्याच्या जागेसाठी युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विजयातही चव्हाण यांचे मोलाचे योगदान होते. दांडगा जनसंपर्क, सर्व पक्षांमध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना संधी दिल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डोंबिवलीत जल्लोष
आमदार चव्हाण यांचा लाल दिवा निश्चित झाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकत्र येत डोंबिवलीत एकच जल्लोष केला. येथील इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक यासह स्टेशन परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
त्यात पक्षाचे नगरसेवक, महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता. भाजपाप्रणीत रिक्षा युनियननेही चव्हाणांच्या जयघोषाचा नारा दिला.