ठाणे : मुंबईतील देवनार आणि ठाणे हद्दीजवळील हरिओमनगर येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने शहरातील सुका कचरा सरसकट डम्पिंगवर न टाकता त्यासाठी कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डम्पिंगवर सुक्या कचऱ्यामुळे आग लागण्याची जास्त शक्यता असल्याने नागरिकांकडून हा कचरा गोळा करून कलेक्शन सेंटरमध्येच त्यावर प्रक्रि या केली जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प खाजगीकरणातून राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात वर्तकनगर, माजिवडा-मानपाडा आणि उथळसर प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली. ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये रोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून त्यामध्ये जवळपास २५० मे.ट. सुका कचरा आहे. यापुढे हा कचरा थेट कलेक्शन सेंटरवर नेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. जी संस्था हे काम करण्यास तयार होईल, तीच संस्था नागरिकांच्या घरोघरी जाऊन सुका कचरा गोळा करण्याबरोबरच वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देणार आहे. या कलेक्शन सेंटरसाठी १० हजार चौरस फुटांची जागा पालिका उपलब्ध करून देणार असून तेथे सुका कचरा आणल्यावर त्यावर प्रक्रि या करण्याची जबाबदारी या संस्थेची असेल. प्रक्रिया केलेला कचरा वेगवेगळ्या इंडस्ट्रीला विकण्याची मुभा या संस्थेला देण्यात येणार असून त्यापासून मिळणारा नफा महापालिका आणि संंबंधित संस्था असा दोघांना मिळणार आहे. झोपडपट्टीला प्राधान्य जनजागृतीनंतर ठाण्यातील काही सोसायट्या सुका आणि ओला कचरा वेगळा करत असल्या तरी मोठी समस्या झोपडपट्टी भागात आहे. जवळपास ३०० टन कचरा केवळ झोपडपट्टीमधून निर्माण होत असून तेथे अशी यंत्रे बसवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
सुक्या कचऱ्याचेच कलेक्शन!
By admin | Updated: April 16, 2016 01:03 IST