ठाण्यात दारुच्या नशेत बेरोजगाराची मखमली तलावात आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Updated: October 10, 2022 15:21 IST2022-10-10T15:20:32+5:302022-10-10T15:21:10+5:30
नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.

ठाण्यात दारुच्या नशेत बेरोजगाराची मखमली तलावात आत्महत्या
ठाणे: दारुच्या नशेमध्ये मनोज दिपू पडवळ (वय सुमारे ४८ वर्षे, रा. जोंधळी बाग, नौपाडा, ठाणे) या बेरोजगाराने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघड झाली. त्याने आत्महत्या केली की तो तलावात पडला, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
नूरीबाबा दर्ग्याजवळ असलेल्या अमोल ऑटोमोबाईल्स समोर असलेल्या मखमली तलावात मनोज पडवळ याचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्याच माहितीच्या आधारे घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. या पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.
त्याचवेळी हा मृतदेह त्याच भागात राहणाऱ्या मनोज पडवळ याचा असल्याचे परिसरातील रहिवाशांनी ओळखले. त्याला दारुचे व्यसन होते. शिवाय, त्याला कोणताही कामधंदा नव्हता. वैफल्यग्रस्त झाल्यानेच त्याने ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नौपाडा पोलिसांनी त्याचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन तपासणीसाठी पाठविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लामखेडे हे अधिक तपास करीत आहेत.