दारूबंदीच्या प्रस्तावाने मद्यसम्राट हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:12 AM2019-12-23T00:12:57+5:302019-12-23T00:13:18+5:30

बारमालकांची झोप उडाली

 Drunkard's proposal shook the alcoholic | दारूबंदीच्या प्रस्तावाने मद्यसम्राट हादरले

दारूबंदीच्या प्रस्तावाने मद्यसम्राट हादरले

googlenewsNext

सदानंद नाईक, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये बेकायदा व्यवसायांमुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी केला. ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शहरात दारूबंदीचा प्रस्ताव महासभेत आणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला मंजुरी दिली. ही प्रस्ताव सरकारकडे त्वरित पाठविण्याचा आग्रह आयुक्तांना केल्यामुळे मद्यसम्राटांचे धाबे दणाणले असून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या शहरातील राजकीय वादातून खून, अत्याचार, विनयभंग, जबरीचोरी, फसवणूक, हाणामारी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना आश्रय मिळाला. त्यातील काही जण नगरसेवक तर इतर पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी झाले. गुन्हेगारीचा पाढाच बोडारे, जाधव यांनी महसभेत वाचून दाखविला. हे रोखण्यासाठी शहरात दारूबंदी करण्याचे मत त्यांनी महासभेत मांडले. अन्य सदस्यांनीही दारूबंदीमुळे शहरातील गुन्हेगारीला ब्रेक लागेल असे सांगितले. या ठरावाने काही जण अडचणी येण्याची शक्यता असून डान्स बार, हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंगचे मालक न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.
शहरातील काही राजकीय पक्षांच्या संबंधित नेत्यांचे स्वत:चे दारूचे कारखाने आहेत. काही जण मुख्य वितरक आहेत. झोपडपट्टी व श्रीमंत वस्तीत गावठी दारूचे अड्डे व हुक्का पार्लर केंद्र सर्रास सुरू आहेत. उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसरांत झोपडपट्टी भागात अमली पदार्थांची विक्री होते. दरम्यान, शिवसेनेने तर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.

रेल्वेस्थानक परिसर डेंजर झोन
उल्हासनगर रेल्वेस्थानक परिसरातून रात्री १० नंतर एकटे जाऊ शकत नाही. कॉलेज तरूण-तरूणी, वृद्ध महिला यांना लुटण्याचे प्रकार सर्रास वाढले असून संजय गांधीनगर व स्कायवॉक मुख्य केंद्र झाले. मध्यंतरी, स्कायवॉकवर पोलीस संरक्षण देत गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, सध्या पोलिसांचे काम रामभरोसे सुरू आहे.

उद्याने, चौक झाले गुन्हेगारांचे अड्डे
गर्द्दुले, भुरटे चोर आदींचा उद्याने, चौक, पानटपऱ्या अड्डे झाले असून २० ते २५ च्या संख्येने घोळका करून टिंगलटवाळी करत असतात. मात्र, चिरीमिरीमुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. हाती मोबाइल व अंगावर सोने ठेवणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया शहरातील नागरिकांची आहे.

डान्स बारमध्ये अनैतिक व्यवसाय
पोलिसांनी डान्स बार, लॉजिंग-बोर्डिंगवर अनेकदा छापे घालून अनैतिक व्यवसायांचा पर्दाफाश केला. मात्र, त्यानंतरही रात्रभर धिंगाणा घालणाºया डान्स बारवर क्वचित कारवाई होते. हप्ता वाढविण्यासाठी अशी कारवाई होत असल्याचे बोलले जाते. पोलिसांनी मनात आणले तर सर्वच अनैतिक व्यवसाय एका आठवड्यात बंद होऊ शकतात. यातून गुन्हेगारीची संख्या वाढल्याने, दारूबंदीसारखा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला.

बारमालकांची झोप उडाली
शहरात दारूबंदी करण्याच्या प्रस्तावानंतर डान्स बार, हुकका पार्लर, गावठी दारूचे अड्डे, हॉटेल आदींच्या मालकांची झोप उडाली आहे. व्यवसायावर गंडांतर येऊ नये म्हणून त्यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे नेमके शहरात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पालिकेने दारूबंदीचा प्रस्ताव सादर करण्याची बहुधा पहिली वेळ असावी. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास भविष्यात अन्य पालिकांमध्येही अशा प्रकारचे प्रस्ताव सादर केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेनेचे गृहमंत्री आहेत. सेना नगरसेविकेनेच दारूबंदीचा प्रस्ताव सादर केल्याने सरकार कुठले पाऊल उचलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Web Title:  Drunkard's proposal shook the alcoholic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.