चालकांना लुटणारी चौकडी अटकेत
By Admin | Updated: April 22, 2017 02:41 IST2017-04-22T02:41:28+5:302017-04-22T02:41:28+5:30
कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या कारसह अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
_ns.jpg)
चालकांना लुटणारी चौकडी अटकेत
ठाणे : कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या कारसह अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटण्याच्या घटना नजीकच्या काळात वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने कापूरबावडी पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बाळकुम परिसरात असल्याची गोपनीय माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांना मिळाली. त्यानुसार, अधिकाऱ्यांसह गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. अक्षय ऊर्फ चिन्मय राजेश उगवेकर, विशाल ऊर्फ मोनू महेशप्रसाद सरोज, अर्जुन रविशंकर तिवारी आणि राजकुमार लोभाजी डोळे यांना शिताफीने अटक केली. सर्व आरोपी १९ ते २३ वर्षे वयोगटातील असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपींच्या अंगझडतीत चोरीचे मोबाइल फोन सापडले. तपासादरम्यान आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, अक्षय उगवेकर याच्या घराची झडती घेतली असता ९ मोबाइल फोन, १ टॅबलेट, दोन कारटेप, मोठा सुरा असा ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास बारावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
गुन्ह्यांच्या
शैलीत साम्य
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांत घडलेल्या लुटमारीच्या चार गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. ४ एप्रिल रोजी पालघर येथील एका टॅक्सीचालकास माजिवडा भागात जबर मारहाण करून आरोपींनी ह्युंदाई एक्सेंट कारसह इतर ऐवज लुटला होता. सर्व तक्रारदारांच्या जबाबातून आरोपींचे वर्णन आणि गुन्ह्यांची शैली यात साम्य असल्याचे स्पष्ट झाले.