डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या नियुक्तीवर स्थायी समितीचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:26+5:302021-04-30T04:51:26+5:30
ठाणे : डॉ. चारूदत्त शिंदे यांची ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल गुरुवारी स्थायी समिती सदस्यांनी ...

डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या नियुक्तीवर स्थायी समितीचा आक्षेप
ठाणे : डॉ. चारूदत्त शिंदे यांची ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल गुरुवारी स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला. ठाणे महापालिकेत यापूर्वी डॉ. शिंदे यांची नियुक्ती केलेली असताना त्यांच्या कामावर ठपका ठेवत त्यांना दुसरीकडे पाठविण्यात आले होते. असे असताना त्यांची पुन्हा ठाणे महापालिकेत नियुक्ती कशी करण्यात आली, असा प्रश्न स्थायी समितीच्या सदस्यांनी केला.
कोविड काळातच एका प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये त्यांच्या कामावर ठपका ठेवत त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती कशीही केली जाते. त्यामुळे स्थायी समितीला काही अधिकार आहेत की नाहीत, असा प्रश्न समिती सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्याधिकारी पदावर डॉ. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी (दि. २८) त्यांनी पदभार स्वीकारला.
भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण म्हणाले की, मृतांच्या झालेल्या अदलाबदली प्रकरणानंतर शिंदे यांना पदमुक्त करण्यात आले होते. मग त्यांना पुन्हा ठाणे महापालिकेच्या सेवेत का घेण्यात आले? ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी चौकशी समितीने त्यावेळी काय चौकशी केली याची माहिती बैठकीत देण्याची मागणी केली. तर विक्रांत चव्हाण यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांची प्रशासनाच्या मनात येईल तेव्हा नियुक्ती करण्यात येते. सभागृहाचे काही अधिकार आहेत का नाहीत? असा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले की, डॉ. शिंदे आणि चौकशी समितीचा संबंध नव्हता. प्रशासकीय बाब म्हणून ते मंत्रालयात गेले होते आणि प्रशासकीय बाब म्हणूनच त्यांची पुन्हा ठाणे महापालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. कोविडच्या कामासाठी विशेष बाब म्हणून ते काम पाहणार आहेत.
.......