डॉ. अन्सारी लढणार निवडणूक

By Admin | Updated: May 13, 2017 00:48 IST2017-05-13T00:48:08+5:302017-05-13T00:48:08+5:30

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने

Dr. Ansari will contest election | डॉ. अन्सारी लढणार निवडणूक

डॉ. अन्सारी लढणार निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यापैकी डॉ. नूर अन्सारी यांना निवडणूक लढविण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.
समाजवादीचे उमेदवार सगीर बशीर खान यांनी प्रभाग क्रमांक १० क साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आॅनलाईन अर्जात क ऐवजी ब नमूद केल्याने छाननीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला होता. तर प्रभाग ९ मध्ये अर्ज दाखल केलेल्या अख्तर केबलवाला यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवाराने निदर्शनास आणून दिले. मात्र एका मुलाचे निधन झाले असून, त्याचा मृत्यूचा दाखला जमा करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा अर्ज बाद केला. काँग्रेस पक्षाच्या डॉ. नूर अन्सारी यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेला व्हीप न पाळल्याने त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येऊ नये म्हणून निलंबित केले होते. या निवडणुकीत अन्सारी यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी छाननीच्यावेळी हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे या तीन उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यापैकी अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात ते उभे ठाकले आहेत.
भाजपा खासदारांचा मुक्काम पद्मानगरमध्ये
भिवंडी : निवडणुकीतील उमेदवार सुमीत पाटील याला निवडून आणण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पद्मानगर भागात मुक्काम ठोकला आहे. प्रभाग क्रमांक १७ चे उमेदवार सुमीत पाटील हे खासदार पाटील यांचे पुतणे असून महापौरपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे या भागातील अपक्ष उमेदवारांच्या समजूती काढणे व मंडळाच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रभागात तेलगू समाजाचा कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहतो. या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंचाला ‘पेदामंची’ असे संबोधले जाते. त्यांना समाजाकडून मान मिळत असल्याने त्याची भेट घेत उमेदवार निवडून येण्याच्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. भाजपाचे शहराध्यक्ष संतोष शेट्टीही याच प्रभागात उभे असल्याने या प्रभागाकडे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे लक्ष असून शिवसेनेच्या उमेदवारासाठी आमदार रूपेश म्हात्रे हे स्वत: मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.
फं्रटची याचिका फेटाळली
मतदारयादीतील घोळाबाबत भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन ती निकालात काढली.
दुबार व बोगस नावांबाबत उच्च न्यायालयाने निर्णय न दिल्याने तसेच त्याचा उल्लेख नसल्याने फ्रन्टच्यावतीने फाजील अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही याचिका निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दाखल होणे अपेक्षित होते. निवडणुकीत अशा समस्या असतात. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध समस्यांवर अनेक तक्रारी दाखल होतील. त्यासाठी ही प्रक्रिया थांबविता येत नाही असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने याचिका निकालात काढली आणि उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

Web Title: Dr. Ansari will contest election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.