कल्याणमधील रस्त्यांवर होतेय डबल पार्किंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST2021-06-30T04:25:48+5:302021-06-30T04:25:48+5:30
कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात ...

कल्याणमधील रस्त्यांवर होतेय डबल पार्किंग!
कल्याण : पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूला फेरीवाला आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यातच दुसरीकडे बाजारात खरेदीसाठी येणारे वाहनधारक एकापाठोपाठ वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पाहायला मिळते.
महमद अली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पश्चिमेतील महत्त्वाचा रस्ता आहे. केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण पाहता रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूककोंडीची समस्या कायम राहिल्याचे सकाळ-सायंकाळी पाहायला मिळते.
कोरोना डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुपारी ४ पर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानांना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी दुचाकी पी १; पी २ प्रमाणे उभ्या केल्या जातात. परंतु, या दुचाकींच्या पाठीमागे बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्क करत आहेत. यात कार, जीपसह अन्य वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला जात आहे. यात तेथून जाणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
कारवाईची अपेक्षा
दुकानदारांचे पदपथावर आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाकडे केडीएमसीचा कानाडोळा झाला आहे. त्यात पुरेशा वाहनतळाअभावी अशा प्रकारे वाहने उभी केली जात असली तरी वाहतूककोंडीला हातभार लावणाऱ्या या कृतीविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला, हवी अशी मागणी होत आहे.
--------------
आनंद मोरे फोटो