ठाणे : शहरातील तीनहात नाक्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने येथे आता डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी येथे अंडरपास काढण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु, आता सध्याच्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलावर आणखी एक पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी २४० कोटींचा खर्च केला जाणार आहे. केंद्राकडून हा निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परंतु, केंद्राने तो दिलाच नाही तर मात्र महापालिका स्वत: हा पूल उभारेल, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.ठाण्यातील कॅडबरी, नितीन कंपनी आणि तीनहातनाका ही तीन महत्त्वाची जंक्शन्स आहेत. त्यापैकी सर्वाधिक वर्दळ तीनहात नाका परिसरात असते. या जंक्शनवरून मुलुंड एलबीएस मार्ग, मुंबई, नाशिक, घोडबंदर, स्टेशन परिसर अशा विविध ठिकाणी वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे, येथे डबलडेकर ब्रिज उभारण्यात येणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने या उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला असून आयुक्तांसमोर तो नुकताच सादर करण्यात आला. सध्या तीनहात नाक्यावर पूर्व द्रूतगती मार्गावरून नितीन कंपनी जंक्शनकडे जाणारा एक उड्डाणपूल आहे. त्याला एलबीएसवरून आणखी एक उड्डाणपूल जोडला जाणार आहे. त्या जोड उड्डाणपुलाहून दमानी इस्टेट आणि गोखले रोडवर जाण्यासाठी दोन मार्गिका असतील. तसेच नितीन जंक्शनहून एलबीएसकडे जाण्यासाठी आणि एलबीएसहून नितीन जंक्शनकडे जाण्यासाठीसुद्धा या उड्डाणपुलाचा वापर करता येईल. या जोड उड्डाणपुलाचा वापर शहरांतर्गत वाहतुकीसाठी केला जाईल. तर, या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी जुन्या उड्डाणपुलावर आणखी एक नवा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. कोपरी, आनंदनगरपासून हा उड्डाणपूल सुरू होणार आहे. तीनहात नाक्यावरील कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सध्या ३२५ सेकंद लागतात. नव्या पुलामुळे हा वेळ वाचेल आणि कोंडीही कमी होईल, असा दावा पालिकेने केला आहे. तीनहात नाक्यावरील कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सध्या ३२५ सेकंद लागतात. डबलडेकर उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक तीन टप्प्यांत विभागली जाणार आहे. त्यामुळे सिग्नलचावेळ ३४ सेकंद इतका कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वाहनचालकांचा वेळ आणि इंधनात मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. या योजनेसाठी केंद्रीय दळणवळण विभागाच्या वतीने अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे त्याबाबत विनंती केली जाणार असून तिथे यश आले नाही तर केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न होतील. दोन्ही पर्याय यशस्वी झाले नाहीत तर पालिका स्वखर्चाने हे उड्डाणपूल उभारेल.- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महानगरपालिका
तीनहात नाक्यावर डबलडेकर उड्डाणपूल
By admin | Updated: April 16, 2016 02:37 IST