सोसायट्यांची दारे उघडली पण मानसिकता बदलत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:33 PM2020-09-26T23:33:32+5:302020-09-26T23:33:53+5:30

संडे अँकर । घरकामगार महिलांची फरपट कायम : लॉकडाऊननंतर समस्या जैसे थे, उपासमारीची आली होती वेळ

The doors of societies opened but the mindset did not change | सोसायट्यांची दारे उघडली पण मानसिकता बदलत नाही

सोसायट्यांची दारे उघडली पण मानसिकता बदलत नाही

Next

स्रेहा पावसकर।

ठाणे : अनलॉकनंतर काही कार्यालये, उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, आमची कामं अजूनही सुरू झाली नाहीत. सुरुवातीला आम्हाला सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जात होता. अनलॉकच्या काही दिवसांनंतर तो खुला केला गेला. आमच्यासाठी सोसायट्यांची दारं उघडली, परंतु घरमालकांकडूनच आम्हाला बोलावले जात नाही. त्यांची मानसिकताच अजून बदललेली नाही. आमची फरपट अजूनही सुरूच आहे, अशा शब्दांत आपली व्यथा मांडली आहे, ती ठाण्यातील अनेक घरकामगार महिलांनी.

लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योगधंदे, कार्यालये बंद झालीत. मात्र, अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. हातावर पोट असणाऱ्या घरकामगार महिलांची कामं मात्र पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊनचे चार महिने हाताला काम नसल्याने अगदीच उपासमारीची वेळ आली होती.
अनलॉक झाल्यावर सुरुवातीला या महिलांना सोसायट्यांमध्ये प्रवेश दिले जात नव्हते. मात्र, आता हळूहळू ठाण्यातील सोसायट्यांमध्ये प्रवेश दिले जात आहेत. त्यÞांची दारं त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. परंतु, ज्यांच्या घरी कामं करायचीत, त्या मालकांच्या घरांचे दरवाजे अजून त्यांच्यासाठी उघडले जात नाहीत. अजूनही त्यांना घरी कामासाठी बोलावले जात नाही. मुळात अजूनही रेल्वे सुरू झालेली नसल्याने अनेक घरांतील महिला या नोकरीला जात नाहीत. त्यामुळे काहींना घरकामगारांची आवश्यकता वाटत नाही. काही घरांमधून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील व्यक्तीला म्हणजेच या घरकामगारांना बोलावण्यास टाळाटाळ केली जाते. तर, काहींनी आम्हालाही घरकामगार ठेवणे परवडत नसल्याचे सांगितले.
परिणामी, घरकाम करणाºया महिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ठाणे शहरात सध्याच्या घडीला नोंदणीकृत हजार-दीड हजार घरकामगार महिला असल्या, तरी नोंदणी नसलेल्या हजारो महिला आहेत.
या सर्वांनाच कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. अनेकांनी जमापुंजी खर्च करून इतके दिवस ढकलले आहेत. काहींनी व्याजाने पैसे काढूनही घरखर्च भागवला.

सोसायट्यांत प्रवेश दिले जातात. मात्र, घरमालकांची मानसिकता कोण बदलणार? आम्हाला कामावर ठेवा म्हणून आम्ही जबरदस्ती नाही करू शकत. परंतु, घरकामगार महिला इतर चार ठिकाणची कामं करून येतात, त्यामुळे त्या कोरोनावाहक आहेत की काय? अशा पद्धतीने आमच्याकडे पाहिले जाते. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मुलंबाळं आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हीही योग्य ती खबरदारी घेतो. फक्त आम्हाला कामाची गरज आहे.
-सुनीता डिमोले, घरकामगार

अनेक घरकामगार महिलांच्या मालकांनी त्यांना कोरोना गेला की कळवतो, असे सांगितले आहे. तर, काहींनी त्या महिलांशी संपर्कही ठेवलेला नाही. एकदोन टक्के मालकांनी घरकामगारांचे पूर्ण सहा महिन्यांचे पगार दिले. पण, उर्वरित घरकामगारांना काम नसल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. काम करण्याची तयारी आहे, फक्त त्यांना काम द्यावे. तसेच सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा.
- रेखा जाधव, ठाणे जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय घरकामगार चळवळ

Web Title: The doors of societies opened but the mindset did not change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे