खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:19+5:302021-04-04T04:41:19+5:30
उल्हासनगर : महापालिकेकडे कोणतेही उत्पन्नाचे स्रोत नसताना त्यात तब्बल ४७७ कोटींची वाढ करीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९३०.४५ ...

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा
उल्हासनगर : महापालिकेकडे कोणतेही उत्पन्नाचे स्रोत नसताना त्यात तब्बल ४७७ कोटींची वाढ करीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९३०.४५ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. महासभेत ९२३.२७ कोटींचे उत्पन्न तर ९२२.४८ कोटी खर्च असा ८९ कोटी.०४ लाख शिलकीच्या अंदाजपत्रकाला महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी ४३०.४५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्याकडे सादर केले होते. शहर विकासाबाबत फारशी तरतूद केलेली नसताना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यांच्या निधीत घसघशीत वाढ केली, तर स्थायी समिती सदस्य, प्रभाग समिती निधी, नगरसेवक निधी गेल्यावर्षीप्रमाणे कायम ठेवला आहे.
उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून, गेल्या महिन्यात अर्धा महिना उलटूनही कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नव्हते. यादरम्यान आयुक्त दयानिधी यांनी उत्पन्नाचे स्रोत बघून सभापती पाटील यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. आयुक्तांनी दिलेल्या अंदाजपत्रकात सुधारणा करून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ३१ मार्च रोजी झालेल्या महासभेत तब्बल ९३०.४५ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापती गैरहजर राहिल्याने शिवसेना व भाजपच्या एका सदस्याने अर्थसंकल्पाचे वाचन केले. खर्च व उत्पन्नाचे आकडे फुगवून ३१ मार्चला उशिरा अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
मालमत्ता कर २०० कोटी, बिल्डिंग परवाने शुल्क २९५ कोटी, एलबीटी-जीएसटी अनुदान २१३ कोटी व इतर अनुदाने-२६८.६५ कोटी, असे एकूण ९२३.२७ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे, तर खर्चामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन व आस्थापना ३२६.२९ कोटी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते ६० कोटी, कोविड व संसर्जन्य आजार १५ कोटी, व्हीटीसी मैदानाची पुनर्बांधणी १० कोटी, दुर्बल घटक ८२.६८ कोटी, दिव्यांग योजना २३.२५ कोटी, स्मशानभूमी नूतनीकरण व विद्युतवाहिनी १० कोटी, असा एकूण ९२२.४८ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे.
उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसताना आयुक्तांनी सादर केलेल्या ४३०.४५ कोटींच्या अंदाजपत्रकात ४७७ कोटींची भर घालून एकूण ९२३.२७ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.