डोंबिवलीत सर्रास उघड्यावर मद्यपान
By Admin | Updated: April 26, 2017 00:18 IST2017-04-26T00:18:42+5:302017-04-26T00:18:42+5:30
पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. राथ आणि पाटकर रस्त्यावर पुलाखाली सायंकाळी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर सर्रास मद्यपान केले जाते.

डोंबिवलीत सर्रास उघड्यावर मद्यपान
डोंबिवली : पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. राथ आणि पाटकर रस्त्यावर पुलाखाली सायंकाळी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर सर्रास मद्यपान केले जाते. त्याचा त्रास सर्वसामान्यांना विशेषत: महिलांना होतो. त्यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. त्यात त्यांच्या काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे आहे का, असा सवाल करत आठ दिवसांत कायमस्वरूपी कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाइल तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे इशारा शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पोलिसांना दिला आहे.
शहरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान केले जाते. महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही येथे होतात. मद्यपींची होणारी भांडणे, वादावादी यामुळे येथे अशांतता निर्माण होते. याबाबतच्या तक्र ारी रोज शिवसेना शाखेत येत आहेत. पाटकर रस्त्यावरील बेकायदा गाड्यांवरील खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य तर धोक्यात येतेच, मात्र या वाढत्या उपद्रवाबाबत शिवसेनेने वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. असे असूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. या प्रकाराला पायबंद घालावा, बेकायदा धंदे चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवसेना ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यावर प्रचंड मोर्चा काढेल. यातून कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपणावर राहील, असे चौधरी यांनी पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)