डोंबिवलीतील प्रवासी ‘लायनीवर आले हो...’
By Admin | Updated: September 11, 2016 02:22 IST2016-09-11T02:22:35+5:302016-09-11T02:22:35+5:30
लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये शिरल्यावर ती रिकामी दिसली तरी त्यामध्ये प्रवेशाकरिता गर्दी, धक्काबुक्की करणारे आणि भांडण ओढवून घेणारे डोंबिवलीकर

डोंबिवलीतील प्रवासी ‘लायनीवर आले हो...’
डोंबिवली : लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये शिरल्यावर ती रिकामी दिसली तरी त्यामध्ये प्रवेशाकरिता गर्दी, धक्काबुक्की करणारे आणि भांडण ओढवून घेणारे डोंबिवलीकर, अशी येथील प्रवाशांची दुर्दैवाने ओळख झाली आहे. मात्र रेल्वे प्रवासी मित्रांनी डोंबिवलीकरांना ‘लायनीवर आणलेय’ सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात रांग लावून शिस्तीत प्रवासी डोंबिवली लोकलच्या डब्यात प्रवेश करतात.
रेल्वेने प्रवास करताना होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ईगल ब्रिगेड दामिनी पथका’ने या उपक्रमाकरिता पुढाकार घेतला आहे. त्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकावर राबवण्यात येणारी क्यू सिस्टीमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही पद्धत सकाळी ७.३० ते १०.३० या गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी महिला प्रवाशांनी मागणी केली आहे.
डोंबिवलीतील नोकरदारांची वस्ती आता दूरवर पसरली आहे. रिक्षा पकडण्याचे दिव्य केल्यानंतर डोंबिवलीकरांना रस्त्यामधील खड्ड्यांचे विघ्न पार पाडावे लागते. त्यानंतर रिक्षावाल्यासोबत सुट्ट्या पैशांवरून होणारा ‘सुखसंवाद’ उरकून घाईगर्दीत रेल्वे स्थानक गाठल्यावर मध्य रेल्वे विस्कळीत असल्याची ‘रोज मरे, त्याला कोण रडे’ ही अनुभूती येते. साहजिकच लेटमार्क व पर्यायाने तीनवेळा उशिर झाल्याने अर्ध्या दिवसांची रजा न गमावण्याकरिता डोंबिवलीकर स्टेशनमध्ये शिरणारी लोकल दिसताच अंगात वीरश्री संचारल्यासारखा बॅग पाठीला अडकवून डब्यात उडी मारण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावतो. त्यामुळे धक्काबुक्की, चेंगराचेंगरीचे प्रकार घडतात. महिलाही ‘मेरी ट्रेन नही छुटने दुंगी’ अशा थाटात महिलांच्या डब्याला लोंबकळतात. या गोंधळात अनेकदा अपघात होतात. त्यात अनेकांना जीव जातो तर काहींना कायमचे अपंगत्व येते.
आता रांगेने त्याच लोकलच्या त्याच डब्यामध्ये प्रवेश केल्यास धक्काबुक्की, चेंगराचेंगरी न होता शर्टाची इस्त्री न विस्कटता प्रवास होऊ शकतो याचा अनुभव अनेक डोंबिवलीकरांना आला. या उपक्रमामुळे अपघातांमध्ये अंशत: घट होईल आणि डोंबिवलीकरांचा व त्यांच्या सहप्रवाशांचा उच्च रक्तदाब आटोक्यात आणणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या डोंबिवली लोकल ज्या २क्रमांकाच्या फलाटात येतात त्या ठिकाणी ‘रांग संस्कृती’ सुरु आहे. आगामी काळात फलाट क्र. ३ वर आणि फलाट क्र. ५ वर ही संस्कृती रुजवण्याची मागणी महिला प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)