डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!
By Admin | Updated: February 14, 2016 03:05 IST2016-02-14T03:05:02+5:302016-02-14T03:05:02+5:30
कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता.

डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. शिवसेना-भाजपाच्या भूलथापांना बळी पडायला नको होते. आता या दोन्ही शहरांतील नागरिकांना आपल्या कर्माची फळे भोगण्याशिवाय पर्याय नाही, अशी कडवट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
मनसेच्या शहरातील मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते येथे आले होते. फडके क्रॉस रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी त्यांनी केला. त्या वेळी त्यांना प्रसिद्धिमाध्यमांनी पाणीबाणीबाबत छेडले असता, त्यांनी ही तिखट आणि तिरकस प्रतिक्रिया दिली. त्या वेळच्या प्रचारादरम्यान आम्ही या दोन्ही पक्षांविषयी सांगत होतो. पण, मतदारांनी तेव्हा विचार केला नाही, त्यामुळे आता त्याचा त्रास होणारच, असे सांगत त्यांनी या प्रश्नांची जबाबदारी पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपावर ढकलली.
या वेळी शहराध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, पक्षाचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चाफेकर यांचाही गौरव
सह्यांच्या संग्रहाचे रेकॉर्ड केल्यामुळे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतीश चाफेकर यांचा समावेश झाला आहे. त्यांच्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल, चाफेकर यांचाही सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.