डोंबिवलीकरांची वाहने रस्त्यावरच; पाटकर इमारतीतील जागा रिक्षास्टॅण्डला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:47 PM2019-06-21T23:47:13+5:302019-06-21T23:47:29+5:30

मनसेच्या विरोधानंतरही महासभेत प्रस्ताव मंजूर

Dombivlikar's vehicles are on the road; In place of the Patkar building, the reservation station | डोंबिवलीकरांची वाहने रस्त्यावरच; पाटकर इमारतीतील जागा रिक्षास्टॅण्डला

डोंबिवलीकरांची वाहने रस्त्यावरच; पाटकर इमारतीतील जागा रिक्षास्टॅण्डला

Next

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील पाटकर इमारतीत वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा नागरिकांच्या वाहनांऐवजी रिक्षास्टॅण्डकरिता प्रायोगिक तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या केडीएमसीच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी मनसेने कडाडून विरोध केला. मात्र, त्याला न जुमानता सत्ताधारी पक्षाने प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांची वाहने रस्त्यावर राहणार आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांना रिक्षाचालकांसाठी स्टॅण्डची चिंता असल्याची बोचरी टीका मनसेने केली आहे.

डोंबिवली रेल्वेस्थानकानजीक असलेल्या बाजीप्रभू चौकातील जागेवर इमारत बांधण्याचे काम महापालिकेने पाटकर यांना दिले होते. या इमारतीत महापालिकेची आरक्षित जागा असून, तेथे पार्किंगची सोय केली जाणार आहे. तळ मजल्यावर ८०१ चौरस मीटर जागा असून, तेथे १२६ दुचाकी व १२ मोटारी तर, पहिल्या मजल्यावरील २७३ चौरस मीटर जागेत ६५ दुचाकी व तीन मोटारींच्या पार्किंगची सोय होणार होती. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र, पार्किंगचा प्लानच पूर्णपणे महापालिकेने बदलला आहे. नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगऐवजी तेथे तळ मजल्यावर ७० आणि पहिल्या मजल्यावर ७० अशा १४० रिक्षांचे पार्किंग करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर महापालिका प्रशासनाने सांगितले की, रेल्वेस्थानक परिसरातील इंदिरा गांधी चौक, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, पाटकर रोड, नेहरू रोड आदी ठिकाणी रिक्षास्टॅण्ड आहेत. स्थानक परिसर रिक्षास्टॅण्डने व्यापला गेल्याने तेथे वाहतूककोंडी होते. १४० रिक्षांच्या पार्किंगमुळे ही कोंडी सुटण्यास मदत होईल. प्रशासनाचीच री सत्ताधारी भाजप-शिवसेनेने ओढली आहे.

वाहतूक पोलिसांकडून त्याबाबत अभिप्राय घेतला असता त्यांनी सांगितले की, पाटकर येथील वाहनतळात १४० रिक्षा उभ्या केल्या तरी बाजीप्रभू चौक, स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा त्यावर उपायच होऊ शकत नाही. स्टेशन परिसर किमान ८०० ते एक हजार रिक्षांनी व्यापलेला असतो. त्यामुळे रिक्षांसाठी भलीमोठी पार्किंगची व्यवस्था पाहिजे. तरच, कोंडीवर मात करता येईल. आता रिक्षांना जागा दिल्याने नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहणार आहेत.

मनसेचे गटनेते मंदार हळबे म्हणाले की, नागरिकांची वाहने रस्त्यावर उभी राहिल्यास वाहतूक पोलीस त्यांच्याकडून दंड वसूल करतील. रिक्षांच्या पार्किंगसाठी ही जागा प्रायोगिक तत्त्वावर देण्यास मनसेने विरोध केला होता. हा विरोध सत्ताधारी पक्षांनी न जुमानता ठरावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे रिक्षांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यात सत्ताधारी पक्षाने धन्यता मानली आहे.

एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्डसाठी तरतूद नाहीच
डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्डचा प्रस्ताव मंदार हळबे यांनी मांडला होता. प्रशासनाने त्याला मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात या स्टॅण्डच्या कामासाठी मागील तीन वर्षांच्या अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद प्रशासनाने केलेली नाही.
राजाजी पथ, स्टेशन परिसरातील रिक्षा एलिव्हेटेड स्टॅण्डवर सामावल्या असत्या. त्यामुळे स्टेशन परिसरातील खालचा भाग पादचारी व अन्य वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा झाला असता.
परंतु, एलिव्हेटेड स्टॅण्ड बनवण्याऐवजी प्रशासनाने स्टेशन परिसरातील पार्किंगची जागा नागरिकांऐवजी रिक्षाचालकांना देण्यात तत्परता दाखवली आहे.

Web Title: Dombivlikar's vehicles are on the road; In place of the Patkar building, the reservation station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.