‘ग्रंथ तुमच्या दारी’ला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: April 23, 2017 04:00 IST2017-04-23T04:00:50+5:302017-04-23T04:00:50+5:30

या योजनेत तब्बल एक लाख २० हजार पुस्तकांच्या १२०० पुस्तकपेट्या देशविदेशात असून त्यापैकी ११ पुस्तकपेट्या सध्या डोंबिवलीत आहेत. येत्या महिनाभरात त्यात वाढ

Dombivlikar's spontaneous response to the book 'Your Dari' | ‘ग्रंथ तुमच्या दारी’ला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘ग्रंथ तुमच्या दारी’ला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
या योजनेत तब्बल एक लाख २० हजार पुस्तकांच्या १२०० पुस्तकपेट्या देशविदेशात असून त्यापैकी ११ पुस्तकपेट्या सध्या डोंबिवलीत आहेत. येत्या महिनाभरात त्यात वाढ केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील वाचनालयास दीडशे वर्षांची परंपरा आहे. ग्रंथालयात जाऊन पुस्तक बदलण्यास आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शक्य होत नाही. परिणामी, शहरातील वाचनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. वाचनाची आवड असलेल्या परंतु वाचनालयात जाणे अशक्य असलेल्या वाचकांना त्याच्या मनाजोगे पुस्तक त्याच्या घरपोच करण्यात आले, तर वाचन चळवळ नक्कीच वाढीस लागेल. या संकल्पनेतूनच ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचा जन्म झाला. मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छा न देता भेट स्वरूपात पुस्तक दिल्यास त्याचा उपयोग होईल, असा विचार पुढे आला. प्रतिष्ठानकडे पुस्तकांसाठी निधी जमा करण्यास नाशिकमधून सुरुवात केली. मित्रमैत्रिणांचा गट, नात्यागोत्यातील मंडळींचा गट तयार केला. यातूनच ‘ग्रंथ आपल्या दारी’ उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमाची २००९ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली.
ग्रंथालय आणि वाचक यांच्यातील अंतर मिटवण्याचा प्रयत्न या उपक्रमाने केला. आता १२०० च्या वर पुस्तकपेट्यांची संख्या पोहोचली आहे. या उपक्रमात पावणेदोन कोटी रुपये किमतीची ग्रंथसंपदा आहे. सहकारी बँका, पतपेढ्या, ग्रंथप्रकाशक या ग्रंथपेट्यांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वत:चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एकसष्टी, सहस्रचंद्रदर्शन किंवा आप्तजनांच्या स्मरणार्थ अशा दिलेल्या देणग्यांतून ग्रंथपेट्या तयार झाल्या आहेत. १०० पुस्तकांची एक पेटी तयार केली. त्यासाठी एक समन्वयक नेमून ती पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली जातात.
स्वदेश ते परदेशात सातासमुद्रापार...
नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, वाई, सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, कोकण, नवी मुंबई, मुंबई, बडोदा, सिल्व्हासा, बेळगाव इथपासून ते दिल्लीपर्यंत ग्रंथपेट्या पोहोचवल्या जातात. एवढेच नव्हे, तर सातासमुद्रापार दुबई, टोकिओ, नेदरलँड, स्वित्झर्लंड, अ‍ॅटलांटा आणि आॅस्ट्रेलिया या देशांतील मराठी माणसांनाही या उपक्रमातील ग्रंथपेट्यांनी आकर्षित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील पाड्यांवरही ग्रंथपेट्या पाठवल्या जातात. नाशिक, ठाणे, पुणे, नागपूर, मुंबई येथील कारागृहांतील बंदिवानांनीही पुस्तके वाचावीत, यासाठी तिथेही पुस्तकपेट्या धाडण्यात येतात. दवाखाने आणि पोलीस ठाणे याठिकाणीही पुस्तकपेट्यांची देवाणघेवाण केली जाते.


पुढचे पाऊल...: डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररीने पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनाचे अनोखे आयोजन केले होते. भारतातील पहिलेच अशा प्रकारचे प्रदर्शन होते. त्यात वाचकांनी ५० हजार पुस्तके जमा केली, तर ३५ हजार पुस्तके वाचनासाठी नेली. ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान झाले.

उरलेली १५ हजार पुस्तके इतर वाचनालयांस दिली जाणार आहे. त्याच धर्तीवर ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम राबवणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ६ व ७ मे रोजी घंटाळी येथे पुस्तक आदानप्रदान उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात २०० ते ३०० पुस्तके मांडण्यात येणार आहेत.

यातील आपल्याला आवडणारी पुस्तके वाचकांना मोफत घेऊन जाता येणार आहेत. त्या बदल्यात त्यांनी एक पुस्तक घरातून आणून जमा करायचे आहे. यातून पुस्तक देवाणघेवाण उपक्रमाला आणखी प्रोत्साहन मिळून वाचकांपर्यंत जास्तीतजास्त पुस्तके पोहोचण्यास मदत होणार आहे.

Web Title: Dombivlikar's spontaneous response to the book 'Your Dari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.