डोंबिवलीत ‘स्मार्ट सिटी’ची गुढी!

By Admin | Updated: March 29, 2017 05:44 IST2017-03-29T05:44:32+5:302017-03-29T05:44:32+5:30

केंद्र सरकारने कल्याण-डोंबिवली शहरांची निवड स्मार्ट सिटी योजनेसाठी केली आहे. केवळ विकासकामे करून शहरे स्मार्ट होत

Dombivli 'Smart City' Gudi! | डोंबिवलीत ‘स्मार्ट सिटी’ची गुढी!

डोंबिवलीत ‘स्मार्ट सिटी’ची गुढी!

डोंबिवली : केंद्र सरकारने कल्याण-डोंबिवली शहरांची निवड स्मार्ट सिटी योजनेसाठी केली आहे. केवळ विकासकामे करून शहरे स्मार्ट होत नाहीत. नागरिकांच्या चांगल्या सवयीच शहराला स्मार्ट करू शकतात. डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छेतेचे नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. त्याचबरोबर स्वच्छ, सुंदर, हरित, प्रदूषणमुक्त डोंबिवली करण्याचा संदेश मंगळवारी येथील नववर्ष स्वागतयात्रेत देण्यात आला. त्यामुळे सांस्कृतिक नगरीला आता स्मार्ट सिटीचे वेध लागल्याचे या वेळी दिसून आले.
गणेश मंदिर संस्थाने नववर्ष स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवली. ही यात्रा आता लोक चळवळ होत आहे. ही केवळ शोभायात्रा नसून, संदेश व जागृतीयात्रा बनली आहे. पश्चिमेतील भागशाळा मैदानात मान्यवरांनी गुढीचे पूजन केल्यानंतर स्वागतयात्रा सुरू झाली. यात्रेच्या प्रारंभीच गणेश मंदिराने ‘स्मार्ट सिटी’ अर्थात स्वच्छ, सुंदर, हरित, प्रदूषणमुक्त डोंबिवली हा संदेश देणारा चित्ररथ साकारला होता. त्यावर विविध विभागातून स्मार्ट सिटी करण्यात नागरिकांचाही सहभाग कसा महत्त्वाचा आहे, हे दर्शवले. संस्थानाने १० कलम तयार करून कुंडली तयार केली. त्यात ग्रहताऱ्यांऐवजी पाणी, आरोग्य, शिक्षण अशा गोष्टी मांडल्या होत्या. यामुळेच भविष्यात डोंबिवली स्वच्छ व सुंदर होईल, असा आशावाद व्यक्त केला.
डोंबिवलीतील प्रदूषण सर्वश्रृत असल्याने डोंबिवली सायकल क्लबचे सदस्य सायकल घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. प्रदूषणमुक्तीचा संदेश त्यांनी दिला. सायकलचा वापर केल्यास वाहनाद्वारे होणारे वायू प्रदूषण रोखता येऊ शकते, यावर भर दिला होता. ‘जल मल्हार शालेय वाहतूक संघटने’ने डोंबिवली स्मार्ट सिटी कराच पण, डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न आधी मार्गी लावा, असा संदेश दिला.
पर्यावरण दक्षता मंच व कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही चित्ररथातून स्वच्छ डोंबिवलीचा संदेश दिला गेला. ऊर्जा फाउंडेशनेने ‘प्लॅस्टीकमुक्त डोंबिवली’ असा नारा दिला. त्याचबरोबर महिला सुरक्षितता किती महत्त्वाची आहे. त्याकडेही लक्ष्य वेधले. ‘कोकण रहिवासीय संघटनेने’ही महिला सुरक्षा व बेटी बचावचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला होता. गणेश मंदिर संस्थानने ‘मुलगी वाचवा’ या विषयावर पथनाट्य सादर केले.
‘वनवासी कल्याण आश्रम’ व माळी समाजाने कॅश लेस व्यवहार करण्याचा संदेश दिला. वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नये, वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे असा संदेश दिला. ‘सररस्वती विद्यामंदिर’ व ‘रेल चाइल्ड’ शाळेने ‘मराठी शाळा वाचवा’ असे आवाहन केले.
‘ज्ञानभाषा’ संस्थेने ‘मराठीतून शिक्षण महत्त्वाचे’ याकडे लक्ष वेधले होेते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंडळ व गोंदवलेकर महाराज भक्तांनी यात्रेत कीर्तन, भजने सादर केली. दत्तनगरमधील स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझिम पथक सहभागी झाले होते. आदिती देशपांडे यांचे आदिशक्ती ढोलपथक प्रथमच यात्रेत सहभागी झाले होते. स्वकुळी साळी हितवर्धक संस्थेने राम, सीता, हनुमान, ब्रह्म, विष्णू, सरस्वती अशा १८ जणांची वेशभूषा परिधान केली.
श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष अच्युत कऱ्हाडकर, प्रवीण दुधे, राहुल दामले, जयश्री क ानिटकर, डॉ. अरु ण नाटेकर, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे विनय देगावकर, सहसंयोजक मंदार कुलकर्णी, अंजिक्य नवरे, संघाचे विश्वसंवाद केंद्राचे सहसंयोजक राम वैद्य, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मुस्लिमांकडून यात्रेचे स्वागत

स्वागतयात्रेत सर्व ज्ञाती, समाज व सर्वधर्र्मीयांना सहभागी करून घेण्यात आले. डोंबिवलीतील जामा मशिदीतर्फे यात्रेचे स्वागत करण्यात आले.

लक्षवेधी तारपानृत्य
वनवासी कल्याण आश्रमने जव्हारमधील तारपानृत्य करणाऱ्या चमूला पाचारण केले होते. या चमूतील १० कलाकारांनी नृत्य सादर करत सगळ््यांचे लक्ष वेधले. त्यांच्या तारपानृत्यावर नागरिकांनीही फेर धरला.

खासदारांकडून पुष्पवृष्टी
डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्या येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी केली. भाजपा नगरसेविका मनीषा धात्रक, नगरसेवक शैलेश धात्रक, मनसे नगरसेवक प्रकाश भोईर व सरोज भोईर यांनी डोंबिवली पश्चिमेत यात्रेचे स्वागत केले.

मनसेने उभारल्या ११ गुढ्या
मनसेला ११ वर्ष पूर्ण झाल्याने पक्षाने ११ ठिकाणी भव्य गुढ्या उभारल्या, अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी दिली.

‘निर्भय’कडून निषेध

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ‘निर्भय’च्या कार्यकर्त्यांनी काळ््या फिती लावून त्याचा निषेध केला. हे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई थांबणार नाही, असा संदेश त्यांनी दिला होता.

तरुणाई सेल्फीमय : नववर्ष स्वागतयात्रेत नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अवघी तरुणाई फडके रोडवर अवतरली होती. मोबाइलवर सेल्फी काढण्यात त्यांचे ग्रुप रमले होते. त्याचबरोबर छायाचित्रणाचा छंद असलेल्यांनी या यात्रेचे क्षण कॅमेऱ्यांमध्ये टिपले.

ऐतिहासिक हत्यारांचे प्रदर्शन
‘क्षितिज ट्रेकिंग संस्थे’ने ऐतिहासिक हत्यारांचे चित्रप्रदर्शन बाजीप्रभू चौकात लावले होते. नागरिकांसाठी तेथे त्यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धाही ठेवली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सगळ््यांनी एकच गर्दी केली होती. ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’ने मर्दानी तालीम सादर केली.

Web Title: Dombivli 'Smart City' Gudi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.