डोंबिवली-पुणे एसटी सोमवारपासून
By Admin | Updated: May 13, 2017 00:54 IST2017-05-13T00:54:55+5:302017-05-13T00:54:55+5:30
डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सोमवारपासून सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे कार्यालयाने मान्य केली आहे

डोंबिवली-पुणे एसटी सोमवारपासून
डोंबिवली : डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सोमवारपासून सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे कार्यालयाने मान्य केली आहे. प्रवाशांकडून या बसची मागणी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘आॅन दी स्पॉट’ या सदराच्या माध्यमातून ८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. मनसेने ही मागणी उचलून धरत शुक्रवारी एसटीचे जिल्हा नियंत्रक अविनाश पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी मान्य केली.
डोंबिवली एसटी बसस्थानकाची दुरवस्था दूर करा आणि डोंबिवली-पुणे बस सोडा, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत. खाजगी बस व कूलकॅबला डोंबिवली-पुणे प्रवासी मिळतात. मग, एसटीकडून डोंबिवली-पुणे बस का चालवली जात नाही? खाजगी बस कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा आरोपही मनसेने केला होता.
मनसे पाठोपाठ शिवसेनेने मंगळवारी डोंबिवली बसस्थानकाची पाहणी केली. मनसेने शुक्रवारी जिल्हा नियंत्रक पाटील यांची विठ्ठलवाडी बस डेपोत भेट घेतली. या वेळी कदम व घरत, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, सागर जेधे आदी उपस्थित होते.
डोंबिवली-पुणे बस का सुरू केली जात नाही, असा सवाल मनसेने पाटील यांच्याकडे केला. त्यावेळी पाटील यांनी कल्याण-आळेफाटा-नगर या बस दर १५ मिनिटांनी कल्याण बस डेपोतून सुटतात. आळेफाटामार्गे पुण्याला जाता येते. त्यावर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इतका द्राविडी प्राणायाम प्रवाशांनी का करावा? डोंबिवली-पुणे बस चालवण्यास काय अडचण आहे, असा सवाल केला.