डोंबिवलीत नव्याने पाणी पेटले
By Admin | Updated: March 10, 2017 04:13 IST2017-03-10T04:13:56+5:302017-03-10T04:13:56+5:30
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांमधील पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने त्याबाबत वारंवार दाद मागूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचा मुद्दा गुरूवारी गाजला.

डोंबिवलीत नव्याने पाणी पेटले
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांमधील पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने त्याबाबत वारंवार दाद मागूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचा मुद्दा गुरूवारी गाजला. पिसवलीतील भाजपाचे नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वाचा फोडताच पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याने त्या तक्रारीची फाइलच फाडून टाकल्याने या विषयावरून प्रचंड गोंधळ झाला. वादावादीनंतर अधिकारी लोकप्रतिनिधींच्या अंगावर धावून जात असल्याने त्याच्या निषेधार्थ शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांनी ठिय्या देत असंतोषाला वाचा फोडली.
कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागांत अनियमित पाणीपुरवठ्याच विषय सतत गाजतो आहे. त्यात २७ गावांतील पाण्यावरून पालिका ाणि एमआयडीसीत टोलवाटोलवी सुरू आहे. पाणी येत नसल्याने नागरिक नगरसेवकांना धारेवर धरत असल्याने नगरसेवक पालिका अधिकाऱ्यांकडे त्याचा सतत पाठपुरावा करत आहेत. प्रश्न सोडविणे सोडा, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी या तक्रारींकडे लक्षच नेत नसल्याने गुरूवारी नगरसेवकांचा संयम सुटला. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेंद्र राठोड यांनी असहकार्याची भूमिका घेत नगरसेवक भोईर यांच्या तक्रारीची फाइल दोन महिने तक्रारीची तशीच ठेवल्यावरून वाद झाला. बेकायदा नळजोडण्यांबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा भोईर यांनी मांडला आणि प्रश्न कधी सोडवणार याचा जाब विचारला. त्याचा राग आल्याने राठोड यांनी भोईर यांची फाइल फाडली. त्यामुळे संतप्त झालेल्या भोईर यांनी त्याचा जाब विचारला.
फाइल फाडणे, लोकप्रतिनिधीच्या अंगावर धावून जाणे, असे प्रकार करण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेल्यामुळे २७ गावांंमधील शिवसेना-भाजपाचे नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी ई-प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, सदस्य राहुल दामले दुपारी चारनंतर आंदोलनाच्या ठिकाणी पोचले. त्यांनी राठोड यांच्या वर्तनाचा निषेध केला. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार राठोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आगामी महासभेत ठेवला जाईल, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर महापौरांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
नेमके वादाचे कारण तरी काय?
दोन महिने हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आणि राठोड लक्ष देत नसल्याने भोईर यांनी सत्ताधारी नगरसेवकांसह बुधवारी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तातडीने तोडगा निघेल, असे आश्वासन दिल्यानंतर भोईर गुरुवारी दुपारी ई प्रभाग कार्यालयातील राठोड यांच्या दालनात पोहोचले आणि काय कारवाई केली, ते विचारत फाइल मागितली.
परंतु, राठोड यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप भोईर यांनी केला. फाइल टेबलवर असतानाही दोन दिवसांनी बघणार का, असा आक्रमक पवित्रा घेत भोईर यांनी ‘काहीही करा पण आताच निर्णय घ्या,’ असे राठोड यांना खडसावले. तरीही राठोड ऐकत नसल्याने दोघांमध्ये वादावादी झाली.
अखेर राठोड यांनी फाइल फाडल्याचा आरोप भोईर यांनी केला. या घटनेमुळे वातावरण तंग झाले. ही घटना पसरताच भाजपा व शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांनी ई प्रभागात धाव घेतली. पाणीप्रश्न सोडवावा आणि राठोड यांनी माफी मागावी, अशा मागण्या लावून धरत नगरसेवकांनी ठिय्या दिला.
राठोड यांच्यावर आरोप
राठोड यांनी अनेक बेकायदा नळजोडण्यांना परवानगी दिली आहे. ते बिल्डरधार्जीणे अधिकारी असल्याचा आरोप सगळ््यांनी केला. बेकायदा पाणीजोडण्यांवर कारवाईसाठीही अनेकदा दाद मागितली गेली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. राठोड लक्षच देत नसल्याचा पुनरुच्चार करत सगळ््यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी वृत्तीचा निषेध केला. त्यात नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, राजन आभाळे, संदीप पुराणिक, राहुल दामले, गटनेते वरुण पाटील, नितीन पाटील, मनोज राय, प्रकाश म्हात्रे, सुनीता पाटील, मुकेश पाटील, दमयंती वझे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड आदी होते. राठोड माफीत मागत नाहीत तोपर्यंत, तसेच २७ गावांतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा नगरसेवकांनी घेतल. त्यामुळे कार्यालयात तणावाचे वातावरण होते.
कारवाई होणारच : महापौर
केडीएमसीतील अधिकाऱ्यांची मुजोरी वाढल्याचे नगरसेवक मोरेश्वर यांना आलेल्या अनुभवावरून स्पष्ट झाले. २७ गावांमध्ये प्रचंड पाणीटंचाई असतानाही त्यांनी फाइल कार्यवाहीविना ठेवली. त्याहून कहर म्हणजे समस्या सोडवण्याचे सोडून राठोड लोकप्रतिनिधींवर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होणार आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांसोबतच असायला हवे. कारवाई काय करायची ते आम्ही प्रशासनासोबत ठरवलेले आहे. अगोदर राठोड यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाईल. त्यानंतर सगळ््या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले.