भूतानच्या मार्शल आर्ट स्पर्धेत डोंबिवलीचा झेंडा फडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 19:01 IST2018-05-29T19:01:24+5:302018-05-29T19:01:24+5:30
भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

देशांतून जवळपास 550, तर महाराष्ट्रातून 150 खेळाडू सहभागी झाले
डोंबिवली : भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
भूतान येथील थिंपू शहरात भूतान इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट संस्थेने 19 ते 20 मे दरम्यान आयोजित केलेली इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इतर देशांतून जवळपास 550, तर महाराष्ट्रातून 150 खेळाडू सहभागी झाले होते. डोंबिवलीच्या युनीटी मार्शल आर्ट सेंटरमधून 8 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या क्लबचे प्रशिक्षक सुनिल वडके यांच्या मार्गदर्शनाखाली या 8 खेळाडूंना घवघवीत यश प्राप्त झाले. यातील निनाद उपाध्ये याने रौप्य व कांस्य, अभिषेक बेळगावकर याने रौप्य व कांस्य, ऋतुजा वाबळे हिने सुवर्ण व कांस्य, सृष्टी भारवे हिने रौप्य व कांस्य, हिमकेश झांजे याने सुवर्ण व रौप्य, सोयल शेख याने सुवर्ण व कांस्य, सिद्धांत कांबळे याने रौप्य व कांस्य आणि कोमल गोपाळ हिने सुवर्ण व कांस्य अशा पदकांची लयलूट केली. मंगळवारी डोंबिवलीत आगमन झाल्यानंतर पदक विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या संदर्भात माहिती देताना युनीटी मार्शल आर्ट सेंटरचे प्रशिक्षक सुनिल वडके म्हणाले, पश्चिमेतील भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदानाजवळ असलेल्या सरस्वती हायस्कुलमध्ये मार्शल आर्ट्सचे सेंटर चालविले जाते. रात्री 9 ते 11 या वेळेत विजेत्या खेळाडूंनी कठोर परिश्रम घेतले. या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले आहे. इंडियाच्या टीममधून भाग घेऊन देशाचे नाव उज्वल करण्याचे ध्येय गाठण्यासाठी या खेळाडूंकडून खडतर परिश्रम करवून घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.